
वाढत्या उष्ण लाटा आणि तापमानवाढ हे हवामानबदलाचे प्रत्यक्ष परिणाम असून याचा सर्वाधिक फटका असंघटित आणि स्थलांतरित कामगारांना बसतो. तो केवळ आरोग्यपुरता मर्यादित नाही, तर आर्थिक, सामाजिक आणि संरचनात्मक असुरक्षिततेला अधोरेखित करतो.
गेल्या दोन दशकांत भारतात उष्णतेच्या लाटांची वारंवारता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अति तापमान आणि उष्ण लाटांना ‘सायलेन्ट किलर’ असे संबोधत २०३० नंतर उष्णतेच्या संपर्कामुळे दरवर्षी सुमारे ३८ हजार मृत्यू होतील, असे भाकीत वर्तविले आहे. जागतिक कामगार संघटनेने, हवामानबदल आणि वाढती उष्णता यामुळे जगभरातील असंघटित आणि स्थलांतरित कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य धोक्यात येत असल्याचे वारंवार सूचित केले आहे.