
Maharashtra flood
esakal
महाराष्ट्रातील आता पूर ओसरत आहे. ज्यांची पिके गेली त्यांचा हंगाम वाया गेला परंतु ज्यांची जमीन खरवडून गेली त्यांच्यासाठी हे संकट फार मोठे असणार आहे. त्यांचे उपजीविका साधनच गेले आहे. पंचनामे, त्यांचे राजकारण होईल. दिवाळी भेट (प्रसिद्धीसाठी तिथपर्यंत ताणले जाईल असे वाटते) म्हणून ती भरपाई दिली जाईल. परंतु या संकटांत वाटेकरी असणाऱ्या अनेक घटकांचे पंचनामे होतील का? हा मोठा प्रश्न आहे...
सध्या महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले आहे. पूर ओसरत आहे. सध्या चर्चा सुरू आहे, पंचनामे भरपाई अशा पद्धतीने! कधीही पाहिला, अनुभवला नाही असा हा पूर होता. मागील पंधरा वर्षाचा विचार केला असता प्रत्येक वर्ष ‘पाऊसमान’ या अनुषंगाने वेगळे असे आहे. या पंधरा वर्षातील दहा-बारा वर्ष बहुतांश भागांत पावसाने सरासरी पूर्ण केली आहे. तरीही त्या बारा वर्षांपैकी आठ वर्षे ही शेतीला पूरक पाऊस नसण्याची आहेत. कारण पावसाचे आगमन, पावसातील खंड, कमी दिवसांत नव्हे काही तासात खूप पाऊस. नेमके याच ठिकाणी आपल्याला हवामान बदल हे संकट लक्षात घ्यावे लागते.