
माणसाच्या आणि प्राण्यांच्या वर्तनात समानता आहे का, याबाबतीत अनेकांची वेगळी मते आहेत. माणूस हा प्राण्यांपासून उत्क्रांत होत गेला, असे आपण म्हणतो किंवा मानतो. तसे असेल तर मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या वर्तनात काही प्रमाणात तरी साम्य असायला हवे. त्यासाठी आजवर अनेकांनी अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहिले. या प्रयोगांमधून बरेचदा विलक्षण माहिती आपल्या हाती लागली आहे. आजही सातत्याने असे प्रयोग केले जातात; मात्र तुलनात्मक अभ्यास करताना केले जाणारे प्रयोग कधी कधी विस्मयचकित करणारे परिणाम घेऊन येतात आणि त्यातून एक नवीनच प्रश्न उपस्थित होतो. यातून होते काय, एक तर पुढच्या प्रयोगांना वेगळी दिशा मिळते किंवा त्याचा प्रवास भरकटतो. पण प्रयोग फसला म्हणून तो करायचे थांबवता येत नाही. मुळात प्रयोग हे शिकण्यासाठीच असतात.
त्यातून घडणाऱ्या घटना आणि समोर येणारे परिणाम जरी सकारात्मक नसले तरी ते आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. असे म्हणतात, की विज्ञान ही एक सतत बदलत जाणारी, प्रगत होत जाणारी प्रक्रिया आहे. त्यातून अपेक्षित उत्तरे हवी असतील तर केवळ एका प्रयत्नावर थांबून चालत नाही; तर पुन्हा पुन्हा तसे प्रयत्न करीत राहावे लागतात. शिवाय जुन्या प्रयोगाने काय धडा दिला, हेदेखील विसरून चालत नाही. लंडनच्या प्राणिसंग्रहालयातील ‘मंकी हिल’वर बबून्स जातीच्या माकडांमध्ये घडलेला हिंसाचार असे अनेक धडे आपल्याला देऊन जातो. शिवाय हे प्रायमेट्स जर माणसांचे पूर्वज असतील तर त्यांच्यातल्या हिंसाचाराचे शिंतोडे आपल्या चारित्र्यावरदेखील उडतातच. त्यामुळे ‘मंकी हिल’च्या हिंसाचाराची अत्यंत सखोलपणे विश्लेषणात्मक चर्चा करायला हवी. त्यातले बारकावे तपासायला हवेत आणि त्यावरून आजच्या परिस्थितीचे अंदाजदेखील बांधता यायला हवेत.