

Vijay Wadettiwar interview
esakal
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असून, छोट्या पक्षांच्या मदतीने निवडणुका लढविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. वडेट्टीवार यांनी ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी पांडुरंग म्हस्के आणि पवन गवई यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये महापालिका निवडणूक आणि विदर्भाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे समाज अजूनही काँग्रेस सोबत जोडलेला आहे, याचा पुरावा मिळाला आहे. शहरी किंवा निमशहरी भागात भाजपची सत्ता आहे. या भागात भाजपकडून आलेला पैशांचा महापूर, निवडणूक आयोगाचे भाजपला असलेले सहकार्य यावर मात करून काँग्रेसला मिळालेले यश नोंद घेण्यासारखे आहे. त्याच धर्तीवर आगामी महापालिका निवडणूक लढविण्याचा प्रयत्न आहे. मुंबईसारख्या शहरात काँग्रेसचा जनाधार कमी झाल्यासारखा वाटत असला, तरी या ठिकाणी छोट्या पक्षांना सोबत घेत निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची भावनाही आघाडी करण्याची असल्याने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन त्यादृष्टीने पुढे जाण्याचा विचार आहे.