
पहलगामचा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशवासीयांना पसंत न पडणारे प्रश्न उपस्थित करताना उतावळेपणा दाखविणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना देशहिताचे राजकारण कसे करायचे असते, याचा नव्याने आणि गंभीरपणाने विचार करावा लागणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षविराम होऊन आठवडा लोटत नाही तोच पहलगामच्या घटनेनंतर तीन आठवड्यांपासून केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांदरम्यानच्या कुरघोडीच्या राजकारणाला लागलेला विराम संपुष्टात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या लष्करी कारवाईनंतर जागतिक आणि देशांतर्गत राजकारणात मोदी सरकार आक्रमक पावले उचलणार याची कल्पना लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभरापासून सुप्तावस्थेत असलेल्या ‘इंडिया आघाडी’चे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला असायला हवी होती. पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध जगभर प्रचार करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडताना तसेच घडले.