
वर्षभरात निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरणाविषयीचे विविध पैलू वाचकांसमोर मांडण्याची संधी मला ‘वनवाटा’ सदरानिमित्त मिळाली. या लेखमालेतून वाचकांना निसर्ग संवर्धनाकडे वळविण्याच्या प्रयत्नांमध्ये थोड्याफार प्रमाणात तरी मी यशस्वी झालो असेन. २५ वर्षांपूर्वी माझ्यावर भुरळ घालणाऱ्या आणि निर्विवादपणे भारतातील ‘जंगल नंबर वन’ असलेल्या कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाबद्दल आजच्या समारोपाच्या लेखात जाणून घेऊया.
२५ जुलै २०२५ रोजी जगप्रसिद्ध शिकारी व निसर्ग संवर्धक एडवर्ड जेम्स कॉर्बेट (जिम कॉर्बेट) यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचे औचित्य साधून हा लेख वाचकांसाठी सादर करण्यात विशेष आनंद होत आहे. १९९० च्या दशकात मी प्रथम जिम कॉर्बेट यांनी लिहिलेले ‘मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ’ हे अप्रतिम पुस्तक वाचले. सुमारे चाळीस वर्षे जिम कॉर्बेट यांनी कुमाऊँ प्रदेशातील माणसांची व गुरांची शिकार करणाऱ्या अनेक वाघ व बिबट्यांना यमसदनी धाडले. या पुस्तकाचे लिखाण रोमांचकारी तर होतेच; पण तेथील नैसर्गिक सौंदर्याचे कॉर्बेट यांनी केलेले वर्णन जंगलात प्रत्यक्षपणे गेल्याचा अनुभव देणारे होते. तेव्हापासूनच वाघांचे अधिराज्य असलेल्या या विलक्षण जंगलाला भेट देण्याची इच्छा मनोमन जागृत झाली.