

Terrorism
esakal
एकविसाव्या शतकातील पहिल्या २५ वर्षांत दूरगामी परिणाम घडविणाऱ्या ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या; ज्यांचे पडसाद पुढच्याही काळात उमटण्याची शक्यता आहे, त्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारे नवे सदर. विविध क्षेत्रांतील १२ महत्त्वाच्या घटनांचा परामर्श या सदरातून घेतला जाईल; प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. सुरुवात ‘नाइन-इलेव्हन’च्या घटनेपासून.
दहशतवाद ही संकल्पना नवीन नाही. जगाने त्याचा वेळोवेळी अनुभव घेतलेला आहे. पारंपरिक स्वरूपाचा दहशतवाद राष्ट्रराज्यकेंद्रित मानला जातो. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी लढणारे गट किंवा संघटना सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय स्वरूपाच्या मागण्या मांडतात; आपल्या क्षेत्रावर अन्याय होत आहे ही त्यांची भावना असते. त्यासाठी शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटले नाहीत, तर ते शस्त्र हाती घेतात आणि मग हा लढा लष्करी स्वरूपाचा होतो. यांच्या मागण्या या निश्चित अशा जनसमूहांच्या संदर्भात आणि भूराजकीय प्रदेशाबाबत असतात; मग तो पॅलेस्टाईनमधील लोकांचा हक्क असेल किंवा काश्मिरी जनतेचा काश्मीरसंदर्भात, शीख संप्रदायाचा पंजाबसंदर्भात किंवा मणिपूरमध्ये त्यांच्या प्रदेशाबाबत असू शकतात. इथे भौगोलिक क्षेत्र आणि जनसमुदाय हा निश्चित असतो. त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद मिळत नाही, या भावनेने हा लढा हा दहशतवादाच्या मार्गाने जातो.