

Dalit human sacrifice case in Jalwakhurd
esakal
विवेक पंडित - pvivek2308@gmail.com
कुणा सवर्णाच्या विहिरीला पाणी लागावं म्हणून सार्वजनिक पाणवठ्यापासून अस्पृश्य असणाऱ्या मातंगाचा बळी दिला जावा, त्याला न्याय मिळवून द्यायला ३३ वर्षं न्यायालयात लढावं लागावं आणि निकालाच्या प्रतीक्षेतच त्यासाठी लढणाऱ्यांची प्राणज्योत मालवावी, हा संविधानाचा पराभव नाही... तर तो संविधानाच्या रक्षणकर्त्यांचा पराभव आहे... राजाभाऊ लोंढे हा फक्त अंधश्रद्धेचा बळी नाही; तर तो शोषणाला, अत्याचाराला अभय देणाऱ्या व्यवस्थेचा बळी आहे...
उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळाखुर्द या गावचा छगन ऊर्फ संगीत पवार या सवर्णाच्या विहिरीचं खोदकाम सुरू असताना २२ मे १९९३ रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास राजाभाऊ लोंढे या अवघ्या २५ वर्षं वयाच्या मातंग युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला... ४० फूट खोदूनही विहिरीला पाणी लागत नाही म्हणून विजेवर चालणाऱ्या क्रेनने विहीर अधिक खोल केली जात होती. क्रेनचालकाचं आसन लाकडी होतं. बाकी सर्व क्रेन लोखंडी होती. ४२५ व्होल्टेजचा विजेचा दाब होता...