

Reverse Migration During Covid
esakal
सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com
गावाकडे परतणं म्हणजे शहर सोडणं नाही. आपल्या जगण्याची पद्धत बदलणं आहे, हे समजून घ्यावं लागतं. कोरोनाच्या काळात याची एक वेगळीच मोठी केस स्टडी आपल्यासमोर आली. संकट आलं तेव्हा गावाकडे परतणं ही मजबुरीही होती; पण काहींसाठी ती पसंतीही बनली.
साल २०२०. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेगळाच धडा दिला. या महामारीच्या काळात भारतातील मजुरांनी शहर सोडून आपलं गाव गाठण्यासाठी कशा अतोनात यातना सहन केल्या, हे आपण सगळ्यांनी न्यूज चॅनेलमधून पाहिलं. हे सगळं अस्वस्थ करणारं होतं. फक्त मजुरांनी गावची वाट धरली होती, असं नव्हे. अनेक कॉर्पोरेटमधले कर्मचारी, ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य होतं, गावी उत्तम नेटवर्क होतं आणि इंटरनेटची सुविधा होती, अशांनीही गावी जाणं पसंत केलं होतं.
अनेक रिटायर्ड माणसं कोरोना काळात गावीच कशी राहिली, त्यांनी गावातच कसे मस्त दिवस त्या कठीण काळात काढले, याचे किस्से आता अनेक जण रंगवून रंगवून सांगतात. कोरोना काळात गावातच राहिलेली माणसं आज कदाचित हा लेख वाचताना शहरात पुन्हा आलेली असतील; पण या लेखाच्या निमित्ताने, कठीण वाटणाऱ्या त्या काळात मुळांकडे परतलेल्यांवर झालेला अभ्यास नेमका काय सांगून गेला आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे.
वेगवेगळ्या सरकारी आणि आंतरराष्ट्रीय अंदाजांनुसार, पहिल्या लॉकडाऊनदरम्यान चार कोटींपेक्षा अधिक लोकांचं रिव्हर्स मायग्रेशन झालं. २०२५ मध्ये या संपूर्ण घटनेचा मागोवा घेताना एका इंग्रजी वृत्तपत्राने सरकारी अंदाजाच्या आधारे पहिल्या लॉकडाऊनमध्ये ४४.१३ मिलियन आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये २६.३ मिलियन इतक्या नेट रिव्हर्स मायग्रेशनचा उल्लेख केलाय.