
हा किस्सा त्या काळातला आहे जेव्हा पुण्याची आयपीएल टीम होती. सामन्याअगोदर एक सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यात नामांकित खेळाडूंनी वापरलेल्या गोष्टी लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा भोगले करणार होता. पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत आमच्या गप्पा चालू होत्या. ‘‘नामांकित खेळाडूंनी दिलेल्या २१ गोष्टी ज्यात बॅट, शर्ट, ग्लोव्हज्, बूट असे आहे म्हणजे कमालच झाली,’’ मी हर्षाला म्हणालो. ‘‘सुनंदन २१ नाही रे बाबा २० वस्तू आहेत, माझ्याकडे यादी आहे उगाच घोळ घालू नकोस,’’ हर्षा कागदाकडे बघत म्हणाला.
‘‘नाही रे हर्षा २१ गोष्टी आहेत. लावतोस का पैज’’, मी हर्षाला आव्हान दिले. हर्षाने मग मला तरातरा आत हॉलमध्ये ओढून नेले आणि टेबलावर मांडलेल्या गोष्टी दाखवत, ‘‘बघ तुझ्या डोळ्यांनी २० वस्तू आहेत,’’ हर्षा म्हणाला. ‘‘हां हर्षा ख्रीस गेलच्या बॅटला तू एक वस्तू धरत असलास तर मी पैज हरलो... मला वाटले की गेलची बॅट दुप्पट आकाराची असल्याने मी त्याला दोन धरले’’, गेलची महाकाय बॅट हातात धरत मी हसत हसत म्हणालो. ‘‘खरे आहे रे मित्रा... ही बॅट म्हणजे दोन बॅटचा आकार आहे,’’ हर्षापण गेलच्या बॅटचा आकार लक्षात घेऊन हसू लागला.