
क्रिकेट जाणकार आणि माजी निवड समिती अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांनी अझरुद्दीनला १९९० मध्ये विचारले होते, ‘‘मियाँ कप्तान बनोगे?’’ मला हे आज आठवण्याचे कारण वेगळे आहे. भारतीय क्रिकेट संघाशी माझे असलेले नाते खूप अगोदरचे होते. केवळ क्रिकेट प्रेम किंवा छंद म्हणून मी १९८६ पासून लिहायला लागलो होतो. अधिकृत दौऱ्यावर जाऊन प्रथम श्रेणीचा सामना कव्हर केला, १९८७-८८च्या मोसमात जेव्हा मुंबईचा संघ हैदराबाद विरुद्ध खेळणार होता. पत्रकार म्हणून अझरच्या भारतीय संघाशी नाते १९९० पासून जुळले ते आजपर्यंत कायम आहे.
१९९०च्याही अगोदर शारजाला जाऊन दोन वेळा एकदिवसीय सामने मी पत्रकार म्हणून कव्हर केले. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेली विश्र्वचषक स्पर्धा मी टीव्हीवर बघत त्याचे सर्व वार्तांकन केले होते. १९९६ मध्ये विश्वचषक स्पर्धा भारतात झाली असूनही लांबूनच मला सामने बघायला मिळाले. नंतर मात्र लगेच झालेल्या तिरंगी एकदिवसीय स्पर्धेचे वार्तांकन करायला मी सिंगापूरला गेलो होतो, तो अनुभव वेगळा होता.