
डॉ. प्रदीपकुमार माने
घरबसल्या वन्यजीवांचे जीवन उत्सुकतेने आणि आत्मीयतेने पाहायला लोकांना सर्वांत पहिल्यांदा कोणी शिकविले असेल तर ते डेव्हिड अटेनबरोंनी! नुकतेच या जगप्रसिद्ध वन्यजीवप्रेमीने वयाचे शतक गाठले. त्यांच्या कार्याची ओळख.
आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात सलग ७३ वर्षे सातत्याने कार्यरत राहणे ही काही साधी गोष्ट नाही. असे कार्यमग्न राहून विसाव्या आणि एकविसाव्या शतकावर आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणे याचे नाव आहे ‘डेव्हिड अटेनबरो’. वयाचे शतक गाठल्यानंतरही ते कार्यरत आहेत. त्यांचा जीवनप्रवास पाहिला की दिसते की, अशा कर्तृत्वाची बीजे त्यांच्या लहानपणातच होती. बालपणीच जीवाश्म संग्राहक असणारा, फक्त अकराव्या वर्षी आपल्या शेजारच्या विद्यापीठाला संशोधनसाठी आवश्यक सालमांडर पकडून विक्री करणारा आणि सतराव्या वर्षी सुंदर फुलपाखरांचा संग्रह करणारा डेव्हिड केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून निसर्गविज्ञानातील पदवीधर झाला.