
मधुबन पिंगळे
पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या छोट्या गावामध्ये १९६७मध्ये एका गटाने प्रस्थापित व्यवस्थेविरोधात उठाव केला आणि त्यातून नक्षलवादाची सुरुवात झाली. कनू सन्याल, चारू मुजुमदार यांच्याकडे या चळवळीचे नेतृत्व होते. आदिवासी समाजासाठी भूमीपुत्रांचे अधिकार आणि सामाजिक न्यायाच्या मागणी करण्यात येत होती आणि त्यासाठी हिंसेचा अवलंब करण्यात येऊ लागला.
पश्चिम बंगालमधून ही चळवळ छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश-तेलंगण या भागांमध्ये पसरली. हा भाग ‘रेड कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणाऱ्या या वन प्रदेशामध्ये ही चळवळ फोफावत गेली. त्यानंतर २००४मध्ये या सर्व संघटना एकत्र आल्या आणि माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या छत्राखाली त्यांनी कारवायांना सुरुवात केली.