Deleted chats can recover by using advance technology
Deleted chats can recover by using advance technology

डिलीट केलेले चॅट देखील उपलब्ध होऊ शकते..!

व्हॉटस्‌ ऍप खूप सिक्‍युअर आहे. चॅट करून आपण डिलीट केले की संपलं. कुणाला काही काही कळणार नाही, या आपल्या भोळ्या भाबड्या विचारांना आता धक्का बसेल असेल तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. यापुढे आपण आपले चॅट, फोटो, व्हिडीओ कितीही डिलीट केले तरी व्हॅटस्‌ ऍपवरील आपले चॅटींग ओपन होऊ शकते, ते नेमके कसे हे जाणून घ्यायचेय का...

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची मैत्रिण, अभिनेत्री रियाने वेगवेगळ्या व्यक्ती सोबत 2 ते 3 वर्षा अगोदर केलेले चॅट व्हायरल झाले व आपण सर्वजण अचंबित झालो आणि सर्वाना एकच प्रश्न पडला की, 2016 - 2017 साली केलेले चॅट कसे काय पोलिसांना सापडतात वा कसे काय शोधतात पोलिस, असे कोणते तंत्रज्ञान आलेय नव्याने जे की सिक्‍युअर अशा व्हॉटस्‌ ऍपलाही धक्का देतेय. पोलीसी यंत्रणा नेमक्‍या कोणत्या तंत्रज्ञानचा वापर करून असे सर्व जुने चॅट ओपन करताहेत...? हे प्रश्‍न सर्वांच्याच मनात घोळत आहेत, त्यावर खूप अभ्यासांती, अनेक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर जे वास्तव समोर आले ते नक्कीच आपल्या वरील भोळ्या भाबड्या विचारांना धक्का देणारे आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या मदतीने गुन्ह्याचा शोध घेताना वेगवेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो, फॉरेन्सिक लॅबमध्ये आरोपी किंवा पीडित व्यक्ती वापरत असलेल्या वेगवेगळ्या साधनांचे परीक्षण केले जाते. हा तपास नेमका कसा केला जातो हे समजून घेण्यासाठी आपण सुशांतसिंगच्या केसचे उदाहरण घेऊ. तुमच्या लक्षात येईल की तीन ते चार वर्षापूर्वीचे चॅट, फोटोग्राफ्स, व्हिडीओ, चॅटमध्ये वापर झालेल्या इमोजी असे सर्वच्या सर्व चॅट पोलिसांनी "ऍज इट इज' शोधून काढले. तपास यंत्रणेने नेमक्‍या कोणत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रग्ज माफिया व सुशांतसिंगच्या गुन्ह्याचा उलगडा केला हे आपण खालील मुद्यांमधून जाणून घेऊ. यासाठी आपण सुशांतसिंगच्या केसचा आधार घेऊयात. 

1) सुशांतसिंग स्मार्टफोन वापरत असल्यामुळे गुगल सतत त्याच्या स्थानांचा मागोवा घेत असे. आशावेळी गरज पडल्यास गुगल हे शासन यंत्रणेने माहिती मागितल्यास वापरकर्त्याच्या स्थानाभोवती किती लोक होते त्याचे तपशील प्रदान करू शकते. घटनेच्या क्रमवारीत अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी सीआरपीसीच्या कलम 91 अन्वये तपास एजन्सी ही माहिती गुगलकडून घेऊ शकते. विशेष म्हणजे हा डेटा बदलता येत नाही किंवा हटविलाही जाऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयीन यंत्रणाही त्याच्यावर विश्‍वास ठेवते, न्याय प्रक्रियेत तो डेटा योग्य पुरवा म्हणून गृहित धरता येऊ शकतो.

2) यातील दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे सेल टॉवर डंप. येथून तपास यंत्रणा हवी ती, हवी तितकी जूनी माहिती अर्थात डेटा मिळवू शकते. लॉकडाऊन दरम्यान प्रवासास, रहदारीस बंदी असताना सुशांतसिंगचा मृत्यू झाला. आशावेळी सेल टॉवर डंप असलेल्या भागात किती लोक होते आणि कोणत्या वेळी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले हा सगळा डेटा सेल टॉवर डंपमधून उपलब्ध होऊ शकतो.

3) सुशांतसिंगचा मृत्यू हा खून होता तर तो पूर्व नियोजित असावा, असे तपास यंत्रणेस किंवा कुणाच्याही सहजासहजी लक्षात येईल. परंतु कोणताही गुन्हा करताना गुन्हेगार हा त्या भागाचा आढावा घेतात किंवा हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या लक्ष्याच्या हालचालींचा मागोवा घेतात. नेमके त्याच ठिकाणी सेल टॉवर डंपचे काम सुरू होते. तेथून मिळालेल्या डेटानुसार तपास यंत्रणेच्या असे लक्षात येऊ शकते की, सुशांतसिंगच्या मृत्यूपूर्वी त्याच्या घराच्या आसपास नेमके कोण - कोण होते, येऊन गेले. सुशांतसिंगच्या मृत्यूच्या वेळी तेथे कोण कोण उपस्थित होते हा डेटा देखील सेल टॉवर डंपच्या माध्यमातून तपास यंत्रणेस उपलब्ध होऊ शकतो. यातून गुन्हातील संशयितांची ओळख पटणे तपास यंत्रणेस सोपे जाते.

4) सुशांतचा मोबाइल आणि लॅपटॉप देखील तपासाच्या विशिष्ट बाबी दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावत असतो. या गॅझेटमध्ये सहसा 70 - 100 ऍप्स स्थापित असतात आणि वापरकर्त्याद्वारे देण्यात आलेल्या विविध परवानग्यांद्वारे हे ऍप्स विशिष्ट डेटा कॅप्चर करतात. या ऍप्सचे सखोल फॉरेन्सिक विश्‍लेषण सुशांतची क्रियाकलाप यादी दर्शवू शकते. त्याने मृत्यूच्या आधी वापरलेल्या या गॅझेटमुळे त्याच्या मानसिक स्थितीचे विश्‍लेषण करण्यास तपास यंत्रणेस मदत होऊ शकते. सुशांतसिंगने व्हॉट्‌सऍप, फेसबुक, गेमिंग आणि म्युझिक ऍप्स, वेगवेगळे ब्राउझर, सर्च हिस्ट्री इत्यादी किती वेळा उघडल्या आणि वापरल्या हे जाणून तपास यंत्रणेत त्यातून काही स्पष्टता मिळू शकते.

5) गूगल व्यतिरिक्त, फेसबुक हे देखील वापरकर्त्यांच्या वर्तन विश्‍लेषणासह अनेक डेटा कॅप्चर करत असते. गेमिंग कन्सोलद्वारे मोशन सेन्सिंग आणि जायरोस्कोपद्वारे घेतलेला डेटा हा वापरकर्त्याच्या मानसिक स्थितीची कल्पना तपास यंत्रणेस देऊ शकतो. याशिवाय व्हॉईस रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ संपादन यासारख्या उपयोगिता ऍप्समध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती असू शकते. त्याचप्रमाणे अलेक्‍सा आणि स्मार्ट टीव्ही डेटा त्याच्याद्वारे कोणत्या आज्ञा दिल्या आणि कोणत्या प्रकारची सामग्री ब्राउझ केली यावरूनही तपास यंत्रणा आपली वैयक्तीक माहिती मिळवू शकतात.

6) आधुनिक फॉरेन्सिक साधने आणि इतर डेटा पुनर्प्राप्ती पद्धती या तपास संस्थांना डेटा, चॅट, फोटोग्राफ्स, व्हिडिओ आणि डिव्हाइसमधून हटविलेली कागदपत्रे पुन्हा उपलब्ध होण्यास मदत करू शकतात. हटविलेली माहिती पुन्हा मिळवण्यासाठी डेटा पुनर्प्राप्ती पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो.

7) व्हॉट्‌स ऍप हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऍप्सपैकी एक आहे आणि यामुळे जास्तीत जास्त माहिती देखील उघड होऊ शकते, हे यानिमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते. जे लोक सुशांतसिंगच्या निकटवर्तीय होते किंवा जे संदेश कॉल करण्यास किंवा सामायिक करण्यासाठी वापरतात त्यांचे अचूक आकलन त्याच्या व्हॉट्‌सऍप चॅटवरुन केले जाऊ शकते. त्याच्यात गप्पा काय झाल्या होत्या, त्याच्या सतत संपर्कात असलेले लोक आणि त्याच्यातील चॅट हे देखील आधुनिक फॉरेन्सिक साधनाच्या माध्यमातून शोधता येते. समजा एखाद्याने सर्व चॅट डिलीट केले तरी ते गुगल ड्राईव्हवर वा ऍपल आय ड्राईव्हवर जतन केलेले असतेच. हे चॅट वापरकर्त्याने डिलीट केले तरी तपास यंत्रणांना उपलब्ध होऊ शकते, ते परत मिळवता येते. तसेच वेगवेगळ्या रिकव्हरी अँप्सच्या मदतीनेही असे चॅट परत मिळवता येते.

8) वापरकर्त्याने वाय-फायच्या राउटरवरुन कोणाकडेही प्रवेश केला आहे, अशी माहितीही उपलब्ध होऊ शकते. कनेक्‍ट केलेल्या सर्व उपकरणांचा तपशील राउटर रेकॉर्ड करतात. त्यातून बराच डेटा उपलब्ध होऊ शकतो. तो सर्व डेटा आपण कितीही डिलीट केला तरी तपास यंत्रणांना गुगलकडून उपलब्ध होऊ शकतो. घटना घडली तेव्हा कोण त्याच्या घराच्या हद्दीत जोडलेले होते किंवा नव्हते  हे देखील हा डेटा देखील उपलब्ध होऊ शकतो. पेअर केलेले डिव्हाइस त्याच्या श्रेणीमध्ये असल्यास वाय-फाय स्वयंचलितपणे कनेक्‍ट होईल, व आपला डेटा सेव्ह होऊ शकेल.

9) आपल्या फोनमध्ये आरोग्य सेतू ऍप इन्स्टॉल्ड केले असेल व त्यावर आपण लॉगीनच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या असतील तर आपल्या जवळच्या सर्व व्यक्तींचा, आपल्या परिचयातील सर्व व्यक्तींचा तपशील या ऍपच्या माध्यमातून आपण सरळसरळ दुसऱ्याला प्रदान करत असतो. कारण आरोग्य सेतू ऍप ब्लूटूथ आणि जीपीएस कनेक्‍टिव्हिटीवर कार्य करते.

10) आपण कोणताही फिटनेस बॅंड किंवा स्मार्टवॉच वापरत असू तर आपल्या झोपेचा, हृदयाचा वेग आणि इतर महत्वाच्या आकडेवारीशी संबंधित डेटाही तपास संस्था प्राप्त करू शकतात. आशा नवनवीन व वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हाचा उलगडा होऊ शकतो.

सध्याच्या डिजीटल युगात सायबर माध्यमातून गुन्हा करणे सोपे झाले असले तरी, गुन्हा करून पळून जाणे फार अवघड आहे. सायबर सेल किंवा चौकशी अधिकारी गुन्हेगाराच्या जी मेल, याहू मेलसह इतर मेलच्या मदतीने गुन्हेगाराच्या व्हॉटस्‌ ऍप मधील बॅकअपच्या मदतीने वरील गुन्हेगारास पकडू शकतात. गुन्हेगाराने डिलीट केलेले मेसेज, व्हिडीओ, फोटोग्राफ्स, चॅटचा बॅकअप्‌ मिळवून त्याव्दारे गुन्हा सिद्ध करू शकतात. म्हणून आधुनिक युगात गुन्हा करून पुरावे मिटवले तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगार पकडला जाऊ शकतो.
      - ऍड. मंजूनाथ कक्‍कळमेली, सायबर कायदे अभ्यासक
 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com