

Digital Amnesia
esakal
अनिकेत स्वराज - sakal.avtaran@gmail.com
सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर अमितच्या लक्षात आले, की त्याचा मोबाईल घरीच राहिला आहे. काही क्षणांतच त्याची अस्वस्थता वाढू लागली. पत्नीचा मोबाईल नंबर आठवेना. मुलाच्या शाळेचा संपर्क क्रमांक आठवेना. बैठकीची वेळ, ग्राहकाचा नंबर, दिवसाचे नियोजन... सगळे काही जणू मोबाईलबरोबरच घरी राहिले होते. मोबाईल हरवला नव्हता; पण काही क्षणांसाठी अमितला स्वतःचा मेंदू हरवल्यासारखे वाटत होते.
हा प्रसंग स्मरणशक्ती कमी झाल्याचा पुरावा नाही; परंतु तो एका बदलत्या सवयीची जाणीव करून देतो. आपण माहिती लक्षात ठेवण्यापेक्षा ती पुन्हा कुठे मिळेल, यावर अधिक अवलंबून राहत आहोत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या संदर्भात याचा संबंध डिजिटल ‘Digital Amnesia’, ‘Google Effect’ किंवा ‘Cognitive Offloading’सारख्या संकल्पनांशी जोडला जातो. मुद्दा असा नाही, की आपली स्मरणशक्ती संपत आहे; तर प्रश्न हा आहे की आठवण्याचा प्रयत्न आपण किती कमी केला आहे?