
इंटरनेटच्या उदयापासून त्यावर उपलब्ध असलेली अश्लील सामग्री हा अनेकांसाठी काळजीचा मुद्दा आहे. याचं कारण त्याचं सतत उपलब्ध असणं, त्यातून निर्माण होणारं व्यसन, माणसांचं विविध प्रकारे होणारं शोषण आणि पोर्न सामग्रीच्या ग्राहक वर्गाचं घसरत चाललेलं वय, असे अनेक काळजी करण्यासारखे मुद्दे आहेत. आज मुलांपर्यंत अश्लील सामग्री सर्व बाजूंनी पोहोचतेय. प्रत्येक गोष्टीत मनोरंजन शोधण्याची वाईट सवय माध्यम शिक्षणाच्या अभावामुळे समाजाला लागलेली आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीचं गेमिफिकेशन सुरू आहे. गेमिफिकेशन म्हणजे नॉन-गेमिंग क्षेत्रात गेमिंगमधील विविध घटक, तत्त्व आणि रचना वापरून माणसांना सतत खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं. डिजिटल जगाच्या निर्मितीनंतर हळूहळू सगळं जगच एका खेळाचा भाग बनत चाललं आहे. हे गेमिफिकेशन सोशल मीडियाचं आहे, पोर्न कन्टेंटचं झालेलं आहे. व्हर्टिकल मिनी सीरिज या नव्या मनोरंजन क्षेत्राचं झालेलं आहे. बातम्यांचं झालेलं आहे आणि राजकारणचंही झालेलं आहे. काळ गेमिफिकेशनचा आहे वगैरे ठीक आहे; पण आयुष्यात येणाऱ्या, डोळ्यासमोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सतत मनोरंजन शोधत राहणं हीच मुळात मोठी समस्या आहे.