

Iran US AI propaganda war
esakal
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
फेब्रुवारी २०२६ चा तो काळ होता. जेव्हा संपूर्ण जगाचे डोळे अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाकडे लागले होते. पारंपरिक युद्धाच्या व्याख्या आपण आजवर ऐकल्या होत्या - सीमांवर तैनात असलेले सैनिक, आकाशात घिरट्या घालणारी लढाऊ विमानं आणि समुद्रात सज्ज असलेल्या युद्धनौका... पण यावेळचं युद्ध काहीतरी वेगळंच होतं. युद्धाच्या या आधुनिक मैदानावर केवळ बॉम्ब आणि मिसाईल्सच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न होत नव्हता, तर सोशल मीडियाच्या पडद्यावर ‘मीम्स’ आणि ‘एआय-जनरेटेड’ व्हिडिओंच्या माध्यमातून एक अत्यंत घातक आणि नवीन प्रकारची लढाई खेळली जात होती. हे डिजिटल युद्ध जगातील करोडो लोकांच्या विचारांवर आणि मानसिकतेवर थेट परिणाम करत आहे. या युद्धात रक्ताऐवजी डेटा वाहतोय आणि शस्त्रास्त्रांच्या जागी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले उपरोधिक मीम्स, लेगो-स्टाइल व्हिडिओ आणि ‘सॅटायरिकल कंटेंट’ वापरले जात आहेत.
या भीषण संघर्षाची ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा अमेरिका आणि इस्राईलने संयुक्तपणे इराणमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले. या पारंपरिक लष्करी हल्ल्यांसोबतच इराणने एक वेगळीच रणनीती आखली होती. इराणने या डिजिटल युद्धात मोठी आघाडी घेतली आणि एआय तंत्रज्ञानाचा शस्त्रासारखा वापर करून थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी तयार केलेले मीम्स हे केवळ विनोद नव्हते, तर ते अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेवर केलेले मानसिक हल्ले होते. या डिजिटल साहित्यामध्ये ट्रम्प यांना वृद्ध, जागतिक स्तरावर एकटा पडलेला आणि वारंवार अपयशी ठरणारा नेता म्हणून चितारण्यात आले. केवळ एवढेच नाही, तर ट्रम्प यांच्या हातावरील जखमा, त्यांच्या ‘मागा’ (MAGA) चळवळीतील अंतर्गत मतभेद आणि अमेरिकन संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या संसदेतील खात्रीच्या वेळी झालेला राजकीय वाद, यावरही या मीम्समधून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्यात आली.