
Mental Health During Disasters
esakal
आपत्तीग्रस्तांना मानसिक पातळीवर आधार देण्यासाठी एक यंत्रणा उभी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपत्तीबाधित भागांत मदतकार्य करणाऱ्या जास्तीत जास्त स्वयंसेवकांऩा आपत्तीचे मानसिक परिणाम आणि त्याबाबतीत करायची मदत याविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. दहा ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन. त्यानिमित्त.
म राठवाडा आणि सोलापूरमधल्या बहुतांश तालुक्यांत गेल्या महिनाभर अतिवृष्टीने प्रचंड हानी झाली आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात तापमानवाढीमुळे नैसर्गिक आपत्तींच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आपत्तीमुळे होणाऱ्या घटनांमधील वाढ लक्षात घेता यावर्षीच्या दहा ऑक्टोबर रोजी येणाऱ्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवसा’ची थीम हीदेखील ‘आपत्तीबाधित व्यक्तींचे मानसिक आरोग्य’ अशी ठेवली आहे. ह्या पार्श्वभूमीवर आपत्तीमधून होणारे मानसिक परिणाम आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा, याविषयी आपण समजून घेतले पाहिजे.
आपत्तीमुळे भौतिक पातळीवर झालेली पडझड नजरेला दिसून येते आणि त्यामुळे त्याबाबतीत मदत करणे हेदेखील शक्य होते; पण आपत्तीमुळे माणसाच्या मानसिकतेवर होणारे परिणामही खूप मोठे असतात. तथापि ते सहजी दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनात आपत्तीमुळे बाधित लोकांना मनो-सामाजिक आधार देण्याची यंत्रणा कार्यरत असते. आपल्याकडे मात्र अशी यंत्रणा जवळजवळ अस्तित्वात नाहीत, असे म्हटले तरी चालेल.