

Diwali Bonus Financial Planning
esakal
शशांक वाघ - keshwa60@gmail.com
दिवाळीचा बोनस खात्यात जमा झाला, की खर्चाचे बेत वाढतात. मात्र, वाढलेला पगार आणि वाढलेली खर्च करण्याची क्षमता म्हणजे आर्थिक समृद्धी नव्हे. महागाई, बदलती जीवनशैली आणि कर्जाच्या हप्त्यांमध्ये उत्पन्नाचा किती भाग खर्च होतो आणि भविष्यासाठी किती शिल्लक राहतो, याचा हिशेब मांडायला हवा. कारण खरी समृद्धी उत्पन्न किती वाढले, यात नसून त्यातून संपत्ती आणि आर्थिक सुरक्षितता किती निर्माण झाली, यात आहे.
दिवाळीच्या आदल्या दिवशी घरात एक वेगळीच लगबग असते. फराळाचे डबे भरलेले असतात, नवे कपडे आलेले असतात, मुलांनी आपापल्या खरेदीच्या याद्या दिलेल्या असतात. कोणाला नवा मोबाईल हवा असतो, कोणाला गाडीची दुरुस्ती करायची असते, तर कोणाला कुटुंबासोबत दोन दिवस बाहेर जायचे असते. त्यातच मोबाईलवर बँकेचा संदेश येतो, ‘आपल्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.’ बोनस आलेला असतो. क्षणभर मनातला हिशेब बदलतो. ‘चला, यंदाची दिवाळी जरा मोठी करूया!’ आणि आपण खरेदीला निघतो. दिवाळीच्या खरेदीला निघताना एक साधा प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो; या वर्षी माझे उत्पन्न वाढले आहे, की फक्त माझा खर्च करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही वर्षांत भारतीय कुटुंबांचे उत्पन्न वाढले, खर्च करण्याची क्षमता वाढली, कर्ज सहज उपलब्ध झाले आणि व्यवहार करणे इतके सोपे झाले, की पैसे खर्च करण्यासाठी आता पाकीटही उघडावे लागत नाही. मोबाइल काढा, खूण करा आणि व्यवहार संपला!