esakal | ज्ञानेश्वरीतील शिक्षण पद्धतीतून घडू शकतील संशोधक
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानेश्वरीतील शिक्षण पद्धतीतून घडू शकतील संशोधक}

संत ज्ञानेश्वरांनी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी रचना करताना गुरू श्री निवृत्तीनाथ त्यांच्यासमोर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रचना केली.

ज्ञानेश्वरीतील शिक्षण पद्धतीतून घडू शकतील संशोधक

sakal_logo
By
राजेंद्र घोरपडे

संत ज्ञानेश्वरांनी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी रचना करताना गुरू श्री निवृत्तीनाथ त्यांच्यासमोर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रचना केली. गुरू-शिष्य शिक्षणाचा, अध्ययनाचा प्रकार, तसेच ज्ञानदानाचा प्रकार विचारात घेण्यासारखा आहे. यावर सखोल चिंतन, मनन आणि अभ्यास होण्याची गरज आहे. आपणास ज्ञानेश्वर घडवायचे असतील तर ही अशी शिक्षण पद्धती निश्चितच विकसित करावी लागेल. विशेषतः उच्च शिक्षणामध्ये किंवा एखाद्या विषयातील तज्ज्ञ (पीएचडी) ही पदवी मिळवताना अशी शिक्षण पद्धती अवलंबण्याचा विचार होण्याची गरज आहे. अशाने निश्चितच ज्ञानेश्वर घडतील. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पीएचडीला प्रबंध म्हणून जसे आपण सादर करतो तसाच आहे. ज्ञानेश्वरीच्या ज्ञानदानातून आजही आत्मज्ञानाची गुरू-शिष्य परंपरा मराठीच्या या नगरीत विकसित होत आहे. मराठीचिये नगरीतील हे ज्ञानपीठ अमरत्वाचे सिंहासन आहे.

पीएचडीमध्ये शिष्याने स्वतः विषय शोधायचा, स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करायचा, स्वतःच तो विषय आत्मसात करायचा, अन् स्वतःच त्यावर आपली मते व्यक्त करायची. यात गुरू केवळ एक मार्गदर्शक असतात. शिष्य काय सांगतो, काय करतो हे फक्त ऐकत असतात. अशा या शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्याची गरज आहे. शिक्षक सांगतात, शिकवतात व शिष्याने त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं, अशी शिक्षण पद्धती सध्या आहे. शिक्षकांनी एखादा भाग काहीच शिकवला नाही तर विद्यार्थी तो भाग शिकवला नाही म्हणून त्यांच्या विरोधात ओरड करतात. म्हणजे शिक्षकांनी शिकवला तरच विद्यार्थी तो भाग शिकणार अन्यथा नाही. ही पद्धत आणि हा विचार दोन्हीही चुकीचे आहे. शिक्षक शिकवो अथवा न शिकवो विद्यार्थ्याने तो भाग हा स्वतः शिकायला हवा. स्वतः तो भाग आत्मसात करायला हवा. तरच तो विद्यार्थी घडेल. त्याच्या बुद्धीचा विकास होईल.

हेही वाचा: उच्च शिक्षणाला व्हावा संत साहित्याचा स्पर्श

आजची मुले मोबाईल गेम किंवा नवे तंत्रज्ञान पटकन आत्मसात करतात. त्यांना न सांगताही ते त्यात पारंगत असतात. मोबाईलमध्ये गेम दडवून ठेवला किंवा त्याला न दिसेल असे केले तरी मुले ते शोधून काढतात. यात त्या मुलांना काहीही शिकवले गेले नाही, पण ते स्वतःच स्वतः शिकले म्हणजे काय मुलांनी स्वतः आवडीने ते शोधून काढले. मोबाईल गेममध्ये त्यांची आवड आहे. आवडीच्या विषयात ते निश्चितच शोधकार्य करतात. अभ्यासामध्येही असेच त्यांनी करायला हवे. म्हणजे ते स्वतः त्या विषयामध्ये पारंगत होतील. आता अशी शिक्षण पद्धती विकसित करण्यावर भर द्यायला हवा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांना त्यांच्या गुरूंनी शिकवले नाही. फक्त आत्मबोधांनी त्यांनी त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेतला.

आणि माझे तवं आघवें । ग्रंथन येणेंचि भावें ।
जे तुम्ही संती होआवें । सन्मुख सदा ।। ३२८ ।।

-ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – आणि माझं ग्रंथ रचणे तर याच हेतूने आहे की, तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे.

अशा प्रकारच्या या ओव्यातून हे स्पष्ट होते. ग्रंथ रचना करता करता ज्ञानेश्वर हे ब्रह्मसंपन्न झाले. या अशा शिक्षण पद्धतीचा प्रयोग होण्याची गरज आहे. भारतातील गुरुकुल पद्धतीत असे प्रयोग पूर्वी केले जात होते. काही दंतकथांतून याची पुष्टी होते; पण आता असे प्रयोग करून विद्यार्थी घडविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. मोबाईल गेम न शिकवता विद्यार्थी तो आत्मसात करू शकतो, मग शिक्षणात का होऊ शकणार नाही? शिक्षणसुद्धा विद्यार्थ्याने स्वतः आत्मसात करायला शिकले पाहिजे.

हेही वाचा: केवळ महाराष्ट्रात आढळते हे झाड; 170 वर्षांपूर्वी अस्तित्वाचे पुरावे

विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवायचे असतील तर त्यांना मोकळीक ही द्यायला हवी. स्वातंत्र्य द्यायला हवे. म्हणजे विद्यार्थी स्वतःच स्वतःची मते मांडतील. ती मते मांडण्यासाठी साहजिकच त्यांना स्वतः अभ्यास करावा लागेल. यातून आपोआपच तो विद्यार्थी त्या विषयात पारंगत होईल. विद्यार्थ्याला काय समजले, हे त्याला स्वतःला सांगण्यास सांगितले तर तो विद्यार्थी आपोआपच अभ्यास करून येईल. शिक्षण पद्धतीत असे प्रयोग करायला हवेत. अध्यात्मामध्ये सर्व अभ्यास स्वतःच शिष्याला करावा लागतो. सर्वच कृती त्याने स्वतः करायची असते. स्वतःच स्वतःचा शोध घ्यायचा असतो. ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण स्वतः करून, स्वतः त्याचा अभ्यास करून आत्मज्ञानी व्हायचे असते. स्वतःच प्रत्येक ओवीचा बोध घ्यायचा असतो. बोधातून, अनुभवातून शिकून आत्मज्ञानाची अनुभुती मिळते. हे सर्व मात्र गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असते याचा विचार मात्र नित्य ठेवायला हवा. ज्ञानप्राप्तीही गुरूंच्याकडून होते. यासाठीच हे ज्ञान त्यांना समर्पित करायचे असते. यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ग्रंथ रचना करताना तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे.

शालेय किंवा उच्च शिक्षणात असा प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती विकसित करणे शक्य आहे. शिक्षण पद्धतीत बदल करताना असे बदलाचे प्रयोगही करायला काहीच हरकत नाही. अशाने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. यातून त्यांच्यात संशोधनाची प्रेरणा उत्पन्न झाल्यास तो सहज आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण होईल. स्वतःच स्वतःला विकसित करण्याची वृत्तीही त्याच्यात जागृत होईल. यातून त्याचा व्यक्तिमत्त्व विकासही होईल.

go to top