

Trump authoritarian rule
esakal
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांचे वागणे एखाद्या सम्राटासारखे आहे. लहर फिरेल तसे ते कारभार करतात, लोकशाही देशाचा प्रमुख म्हणून त्यांचे वर्तन प्रगल्भ असल्याचे आजपर्यंत दिसलेले नाही. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ज्या पद्धतीने नुकतीच अटक केली, ती अशीच लहरी कारभाराचा नमुनाच होती. काय होतील या घटनेचे परिणाम, ट्रम्प कारभार करतात म्हणजे काय, या साऱ्या प्रश्नांवर ‘खोचक’ भाष्य...
डोनाल्ड ट्रम्प यांचा अश्वमेध रथ निघाला आहे. त्यानं व्हेनेझुएला जिंकलं आहे. पाठोपाठ कोलंबियाचा नंबर लागेल. त्या पाठोपाठ ग्रीनलँडवर ट्रम्प स्वारी करतील. इराण स्वारीचंही रणशिंग ट्रम्पनी फुंकलंच आहे. युरोप ही हरलेली आणि बेकार सिव्हिलायझेशन आहे, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांचं आरमार त्या दिशेनं जाण्याची आखणी करत आहे. ट्रम्प हा एक अत्याधुनिक फेनॉमेना, चमत्कार आहे, या चमत्काराचे अर्थ लावण्यात पुढला किती काळ जाईल ते सांगता येत नाही. व्हेनेझुएलात जगातला सर्वांत मोठा तेलसाठा आहे. काही अमेरिकन कंपन्या ते तेल खोदणं आणि शुद्ध करण्याचं काम करत असत. त्या कंपन्या व्हेनेझुएला सरकारनं सार्वजनिक मालकीच्या केल्या आणि त्या कंपन्यांचे पैसे बुडवले. ट्रम्प यांना ते पैसेच नव्हे, तर त्या कंपन्याही हव्या आहेत. व्हेनेझुएला अमेरिकेच्या शत्रूंना तेल स्वस्तात विकतं. व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादनामुळं तेलाच्या किमती खाली येतात. त्यामुळे अमेरिका, सौदी, अमिराती, कतार इत्यादी देशांचं नुकसान होतं. त्यासाठी त्या सर्व देशांना व्हेनेझुएलावर नियंत्रण हवंय. ‘गंदा है फिरभी धंदा है’ हे ट्रम्प यांचं घोषवाक्य आहे. त्याला अनुसरून ट्रम्प यांनी व्हेनेझुएला काबीज केलंय.