
विनोद राऊत
rautvin@gmail.com
जगभरात मानव अधिकार, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारी जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणून अमेरिकेची ओळख आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून जागतिक महासत्ता असलेल्या शक्तिशाली देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती गेल्यानंतर अमेरिकेची मूळ ओळख पुसण्याच्या मार्गावर आहे. जगाला लोकशाहीचे धडे देणाऱ्या, लोकशाहीसाठी आग्रह धरणाऱ्या, प्रसंगी अनेक देशांमध्ये स्वहितासाठी का होईना; मात्र तख्तापालट करणाऱ्या या देशाच्या अध्यक्षाचे वर्तन हुकूमशाहीकडे जाणारे आहे. मुळातच ग्रेट महासत्ता असलेल्या देशाला ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ म्हणत अमेरिकेला मागे नेण्याचे काम ट्रम्प यांच्याकडून सुरू आहे. पुढची चार वर्षे ट्रम्प यांच्या निर्णयाची झळ अमेरिकेसह संपूर्ण जगाला भोगावी लागणार आहे.
१० फेब्रुवारीला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने डझनावारी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स म्हणजे अध्यक्षीय वटहुकूमावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यातील अनेक वटहुकूम हे अमेरिकेतील लोकशाहीच्या चेक ॲण्ड बॅलन्स तत्त्वाचे सरळ सरळ उल्लंघन करणारे होते. अमेरिकन काँग्रेसवर म्हणजेच कॅपिटॉलवर हल्ला करणाऱ्या सर्व हल्लेखोरांना सरसकट माफी देण्याचा आदेश ट्रम्प यांनी काढला. हा वटहुकूम म्हणजे अमेरिकेच्या लोकशाहीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. ज्यो बायडेन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग रोखण्यासाठी ट्रम्प यांच्या चिथावणीने त्यांच्या समर्थकांनी, गुडांनी हा हल्ला केला.