
नितीन जगताप
Nitinjagtap13@gmail.com
‘कापसाचे अर्थशास्त्र’ पुस्तकातून अनेक महत्त्वाचे संदर्भ, निरीक्षणे व निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून कापसाचे आर्थिक गणितही समजून घेता येते.
इकॉनॉमिक्स ऑफ कॉटन’ अर्थात ‘कापसाचे अर्थशास्त्र’ हे डॉ. अदिती सावंत यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. पेशाने अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका असलेल्या लेखिका अदिती सावंत यांनी त्यातून देशाअंतर्गत ते जागतिक कापसाच्या अर्थशास्त्राचा, बाजारपेठेचा सविस्तर पट मांडला आहे. महाराष्ट्रासह देशातील तीन प्रमुख कापूस उत्पादक राज्यांतील कापूस उत्पादन, सिंचनाची व्यवस्था, लागवडीचा खर्च, मिळणारी आधारभूत किंमत या सर्व महत्त्वाच्या बाबींचा तुलनात्मक आढावा या पुस्तकातून समोर येतो.
चीन, अमेरिका या देशात भारतीय शेतकऱ्यांच्या तुलनेत अधिक अनुदान कसे मिळते, त्यावर सविस्तर आकडेवारीसह प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ठोस आकडेवारी व तुलनात्मक आलेख अशी मुद्देसूद मांडणी करून लेखिकेने राज्यातील कापूस शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न तसेच वाढत्या शेतकरी आमहत्येमागच्या कारणांचा सविस्तर उलगडा पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.