

डॉ. शैलेंद्र देवळाणकर
विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योगप्रधान देश बनवणे, उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. यासाठी साधनसंपत्ती विकास, परकीय गुंतवणुकीबरोबरच कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाचेही तेवढेच महत्व आहे. कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची आखणी व अमलबजावणी करण्यात येत आहे.
भारतात शिक्षणात कौशल्य विकासाचा अंतर्भाव आणि शिक्षणाच्या लोकशाहीकरणाची मागणी सर्वांत प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. म्हणूनच डॉ. आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार हे कुशल भारत व राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मुख्य आधार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ६५ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास चाळीस वर्षे ही शिक्षण क्षेत्रात घालवली आहेत. ते एक प्रभावी शिक्षणशास्त्री होते. त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व अंतर्ज्ञानशाखीय होते. एन्थ्रॉपॉलॉजी (मानववंशशास्त्र), इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि कायदा या विषयांवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व होते.