

Dr. Ambedkar's views on China and Tibet policy
esakal
विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार
सध्याच्या या काळात संपूर्ण जगात युद्धजन्य हिंसा आणि रक्तपात यांचे भीतिदायक वातावरण असताना भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आणि डॉ. आंबेडकरांच्या चिंतनातून साकारलेल्या संकल्पनांना पुढे घेऊन जाण्याची आज विशेष गरज आहे. तसे झाले तरच ‘वसुधैव कुटुंबकम’चे सूत्र सर्वमान्य होऊ शकेल.
आ पल्या देशातील अनुसूचित-जाती आणि जनजाती समूहांप्रमाणेच युरोपातील ‘रोमा’ समाज अनेक शतके केवळ अन्याय, अत्याचारांचाच नव्हे तर अतिशय घातक अशा आध्यात्मिक अस्पृश्यतेचा बळी ठरत आला आहे. हंगेरी, रुमानिया, फ्रान्स अशा अनेक देशांमधून ‘रोमा’ लोक राहतात. या समाजातला एक हुशार हंगेरियन विद्यार्थी म्हणजे आज हंगेरीतील मिस्कॉल्क शहरात राहणारे एक प्रतिष्ठित नेते जानोस ओर्सॉस! रोमा समाजावरील अन्यायांच्या संदर्भात काम करत असतानाच त्यांना भारतातील दलित समुदायांवर झालेल्या अन्यायाबद्दल वाचायला मिळाले. विद्यार्थीदशेत असतानाच भारतीय लोकशाहीच्या अभ्यासासाठी ते अनेकदा भारतात, अगदी पुण्यातही येऊन गेले. डॉ. आंबेडकर हे उपेक्षित आणि अन्यायग्रस्त समाजांच्या संघर्षाचे एक प्रेरणादायी प्रतीक आहेत हे त्यांना उमजले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याने प्रभावित होऊन ते परत हंगेरीत गेले आणि मिस्कॉल्क शहरात त्यांनी मुख्यत्वे रोमा समुदायाच्या मुलांसाठी एक शाळा सुरू केली आणि त्या शाळेचे नामकरण केले ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय’! बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा केवढा सर्वंकष, विश्वव्यापी प्रभाव आहे, हे ध्यानात येण्यासाठी एवढे एक उदाहरणसुद्धा पुरेसे ठरावे.