Dr Milind Shinde Father Retirement Story
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
तांबडेबाबा पात्र असलेली मालिका जोरात सुरू होती. मिलिंदचे वडील त्याचवेळी निवृत्त झाले होते, संपूर्ण आयुष्य कष्टात आणि संघर्षात घालवलेल्या मिलिंदच्या वडिलांचा पीळ विलक्षण होता, देवधर्म न मानणाऱ्या आणि जातीय उतरंडीला तोंड दिलेल्या वडिलांची निवृत्तीनंतरची काही स्वप्ने होती, मात्र नियतीच्या मानत काही वेगळंच होतं, ‘श्रावणबाळ’ मिलिंदसमोर वेगळीच समस्या उभी ठाकली, काय घडलं नेमके ...
‘‘मी काय असा कोपऱ्यात बसणार नाही बाकी पेन्शनर लोकांसारखा... उद्यापासून कोर्टात जाणार...’’
३१ जानेवारी २०१० ला महसूल सेवेतून डेप्युटी कमिशनर म्हणून रिटायर्ड झाल्याल्या दिवशीचं माझ्या वडिलांचं हे वाक्य...
‘‘ कोट शिवून ठेवलाय... बॅग भरून ठेवलीये... उद्या सकाळपासून कोर्टात... भलेही माझी प्रॅक्टिस चालो ना चालो, प्रोसिडिंग्ज ऐकणार. रोज कोर्टात जाणार... मला काही कमवायचं नाही, पण घरात रिकामं कोपऱ्यात बसायचं नाही... तुमच्या भाषेत ते नेपथ्य का काय म्हणून... माझी पेन्शन मला भरपूर आहे. तुम्हा सगळ्यांना अजून सांभाळू शकतो...’’
मागे सांगितल्याप्रमाणं मी जेव्हा ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला त्याच वर्षी त्यांनी शासकीय सेवेत असताना लॉच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. मी बी.कॉम. आणि ते एल.एल.बी. एकाच वर्षी झालो... ते एमपीएससी कडून महसूल सेवेत रुजू झाले... आज सेवानिवृत्त झाल्यावर त्याचं हे घरात सुरू होतं...