

Bhimbetka Caves Paintings
esakal
राकेश मोरे - rakesh.more@esakal.com
पुरातत्त्वज्ञ डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर रेल्वेने प्रवास करत असताना एका ठिकाणचे काही वेगळे खडक पाहून तिथल्या एका स्थानकावर उतरले आणि त्या भागाचा त्यांनी शोध घेतला. तिथे त्यांना गुहांमध्ये प्राचीन रंगीत चित्रे सापडली. पुढे हे ठिकाण ‘भीमबेटका’ म्हणून प्रसिद्ध झाले. येथे हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी जीवन, शिकार, नृत्य आणि प्राण्यांची चित्रे आढळतात. त्यामुळे हे स्थळ मानव इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
वर्ष १९५६. उन्हाळ्याचे दिवस. मध्य प्रदेशातील भोपाळहून इटारसीकडे जाणारी रेल्वे हळुवार गतीने धावत होती. खिडकीबाहेर उडणारी धूळ, कोरडी आणि दूरपर्यंत ओसाड जमीन दिसत होती. कधी एखादे झाड, तर कधी दूरवर पसरलेले डोंगर. बहुतेक प्रवासी आपल्या विचारात किंवा गप्पांमध्ये गुंग होते; पण त्या डब्यात एक प्रवासी मात्र शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होता. ते होते डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर. रेल्वे पुढे सरकत असताना अचानक त्यांच्या नजरेस दूरवर काही मोठमोठे खडक दिसले. त्या खडकांचे आकार वेगळेच वाटत होते. त्यांच्या शोधक नजरेला त्या डोंगरांमध्ये एखादी गोष्ट लपलेली आहे, असे जाणवले. डॉ. वाकणकर काही क्षण त्या खडकांकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात विचारांची गर्दी झाली.