

Drone Transport for Tuberculosis Samples
esakal
कल्पना करा, एखाद्या दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या व्यक्तीला केवळ क्षयरोगाची तपासणी करून घेण्यासाठी ३० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. खराब रस्ते, अपुरी सार्वजनिक वाहतूक, दिवसाची बुडालेली मजुरी आणि प्रवासावर होणारा अतिरिक्त खर्च अशा अनेक अडचणींमुळे अनेकदा रुग्ण वेळेत तपासणीच करत नाही. परिणामी, निदान उशिरा होते आणि आजार अधिक गंभीर होण्याबरोबरच संसर्गाचा धोका वाढतो.
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात ही समस्या काही नवीन नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगातील प्रत्येक चार क्षयरोग रुग्णांपैकी एक रुग्ण भारतात आढळतो. त्यामुळे क्षयरोगाचे वेळेवर निदान करणे ही देशासमोरील अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक आरोग्याची गरज ठरते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या माहितीनुसार या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तेलंगणातील यादाद्री-भुवनगिरी जिल्ह्यात एक अभिनव प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात रुग्णाला प्रयोगशाळेत पाठवण्याऐवजी त्याच्या तपासणीचा नमुना ड्रोनच्या मदतीने थेट प्रयोगशाळेत पोहोचवण्यात आला. या प्रयोगामुळे निदानासाठी लागणारा वेळ, रुग्णाचा आर्थिक खर्च आणि प्रवासाचा त्रास लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले.
मात्र, हा प्रयोग नेमका कसा राबवण्यात आला? त्यातून काय निष्पन्न झाले? तो देशभर राबवणे शक्य आहे का? त्यासाठी कोणत्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबी आवश्यक आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चला जाणून घेऊया हा सविस्तर लेख.
भारतामध्ये क्षयरोग हा अद्यापही एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२५ च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये जगातील एकूण क्षयरोग रुग्णांपैकी सुमारे २५ टक्के रुग्ण भारतात नोंदवले गेले. २०२४ मध्ये भारतातील अंदाजित प्रादुर्भाव दर प्रति लाख लोकसंख्येमागे १८७ इतका होता, उपचार कव्हरेज ९२ टक्क्यांपर्यंत वाढले आणि २६.१८ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचे निदान झाले. काही प्रमाणात प्रगती झाली असली, तरी प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे रुग्णसंख्या मोठीच राहिली आहे आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये वेळेवर निदान करणे अजूनही कठीण ठरत आहे.
क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार आहे; उपचार न केलेला रुग्ण एका वर्षात सुमारे १० ते १५ जवळच्या व्यक्तींना संसर्ग पसरवू शकतो. त्यामुळे लवकर निदान केल्यास रुग्णाचा जीव वाचवता येतो, औषधांना प्रतिकार करणारा क्षयरोग वेळेत ओळखता येतो आणि संसर्गाचा फैलाव थांबवून त्याची साखळी तोडता येते.