

Operation Epic Fury
esakal
डॉ. मनीष दाभाडे सहयोगी प्राध्यापक, जेएनयू
अमेरिका-इस्राईलने इराणवर हल्ला केल्यानंतर, रशिया व चीन या इराणच्या मित्रदेशांनी सावध भूमिका घेतली. केवळ निषेधाच्या प्रतिक्रिया देण्यापुरते दोन्ही देश मर्यादित राहिल्याचा आरोप झाला. मात्र, या दोन्ही देशांची भूमिका हिशेबी असून, त्यांच्या विभागातील सध्याचे हितसंबंध आणि भविष्यातील दीर्घ सामरिक पावलांची गणिते त्यामागे आहेत.
अमेरिकी बी-२ बॉम्बर्स आणि इस्रायली एफ-३५ विमानांनी २८ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री इराणी आकाशात शिरकाव करीत जोरदार बॉम्बफेक केली. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव दिलेल्या मोहिमेची ही सुरुवात होती. त्यानंतर या संपूर्ण प्रदेशातील आकाश क्षेपणास्त्रे, ड्रोनचे थवे यांनी व्यापून गेले होते, होर्मुझ सामुद्रधुनीवरही तणावाचे सावट पसरले होते. या संपूर्ण स्फोटक परिस्थितीकडे सर्व जगाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यावेळी अधिक दीर्घकालीन आणि निर्णायक नाट्य रशिया व चीनच्या शांत दालनांमध्ये घडत आहे. या दोन्ही देशांमधील पुनरुत्थानवादी सत्ता युद्धाची आग आटोक्यात आणण्यापेक्षा हिशोब मांडत बसल्या आहेत.
या युद्धाबद्दल रशिया आणि चीन नक्की काय साध्य करू इच्छितात आणि केवळ काय बोलून दाखवत आहेत, हे समजून घेण्यासाठी त्यांच्या हितसंबंधांचे सूक्ष्म विभाजन करणे आवश्यक आहे. व्यापक अर्थाने दोन्ही देश अमेरिकी वर्चस्वाला आव्हान देण्याच्या अजेंड्यावर एकत्र असले, तरी या विशिष्ट संघर्षातील त्यांची रचनात्मक स्वार्थसाखळी एकमेकांपासून भिन्न आहे. रशिया मूलतः अल्पकालीन संधीवादी देश आहे; चीन दीर्घकालीन धोरणकर्ता देश आहे. दोन्ही देशांचा आविर्भाव तटस्थतेचा असला, तरी यांतील कोणताही देश इराणचा निष्ठावान मित्र नाही. हे भान या युद्धानंतरच्या जागतिक व्यवस्थेचा आराखडा समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.