
गुरु राणे
कोकणातले पर्यटन वाढत आहे. यातून निर्माण होणारे अर्थकारणही विस्तारत आहे; मात्र पर्यटन बहरत असताना येथील निसर्गाला यत्किंचितही धक्का लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. विकास कामे करताना झालेल्या वृक्षतोडीची भरपाई लगेच व्हायला हवी. यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यायला हवेत. सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या मालवण शहराची शुद्धता पर्यटनाच्या नादात हरवून तर जाणार नाही ना, अशी भीती कधीकधी वाटते. ही भीती दूर होण्यासाठी कोकणचा मूळ ढाचा कायम राखून पर्यटनाला पंख फुटायला हवेत.
रोजगाराच्या बाबतीत मागे असल्याचा शिक्का कोकणावर अनेक वर्षांपासून बसला आहे; मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटनामुळे तो पुसला जाईल असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायात उतरत आहेत.