

Competitive Exam Security Studies
esakal
लेखक : गौरव कुमार बाळे
अंतर्गत सुरक्षा हा युपीएससी व एमपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन (GS-3) मधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्राची सार्वभौमता, सामाजिक स्थैर्य आणि आर्थिक विकास टिकवण्यासाठी सुरक्षित अंतर्गत वातावरण आवश्यक असते. भारतासारख्या विविधतेने समृद्ध आणि विस्तीर्ण भौगोलिक रचनेच्या देशात दहशतवाद, नक्षलवाद, सीमासंबंधी आव्हाने, सायबर गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी आणि माहिती सुरक्षेचे धोके यांसारख्या अनेक समस्या अंतर्गत सुरक्षेच्या चौकटीत येतात. त्यामुळे या विषयाची तयारी करताना घटनांचे केवळ वर्णन न करता कारणमीमांसा, परिणाम आणि शासनाच्या धोरणात्मक उपाययोजना यांचे विश्लेषणात्मक आकलन आवश्यक असते.
तयारीची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रमाचे सूक्ष्म विश्लेषण (syllabus decoding) करणे होय. GS-3 मधील अंतर्गत सुरक्षा विभागात सीमाव्यवस्थापन, दहशतवादी संघटनांचे जाळे, नक्षलवादी चळवळ, सायबर सुरक्षा, मनी लॉंडरिंग, बनावट चलन, संघटित गुन्हेगारी तसेच विविध सुरक्षा यंत्रणांची भूमिका या मुद्द्यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना प्रत्येक घटकाचा विचार चार दृष्टीकोनांतून करणे उपयुक्त ठरते. समस्येची पार्श्वभूमी, मूळ कारणे, राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम आणि दीर्घकालीन उपाययोजना. या चार दृष्टीकोनांतून उत्तरलेखन अधिक सुसंगत आणि विश्लेषणात्मक होते.