

Eiffel Tower Controversy
esakal
रोहिणी गोसावी - sakal.avtaran@gmail.com
आयफेल टॉवरवरील एका धार्मिक शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान महिलांशी झालेल्या कथित भेदभावामुळे फ्रान्समध्ये राजकीय आणि सामाजिक वादाला तोंड फुटलं. संबंधित घटनेने केवळ शिष्टमंडळाच्या आणि आयफेल टॉवर व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही, तर धर्म, स्त्री-पुरुष समानता, फ्रेंच लोकशाहीची मूल्यं आणि फ्रान्समधील भारतीयांची प्रतिमा यांवरही नवी चर्चा सुरू केली आहे.
आयफेल टॉवर केवळ पर्यटनस्थळ नाही, तर फ्रेंच प्रजासत्ताकाचं प्रतीक आहे. त्यामुळे त्या लोखंडी मनोऱ्यात लिंग समानतेला तात्पुरता धक्का लागला तरी फ्रान्सच्या लोकशाही तत्त्वांवरच प्रश्न निर्माण होतो. तसंच, आजीवन ब्रह्मचर्याचं प्राचीन व्रत आणि लिंगभेद हे एकच आहेत का, हा प्रश्नही उपस्थित होतो.
कला आणि फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या पॅरिसला निदर्शनं आणि संपाचं शहरही म्हटलं जातं. नियमित होणाऱ्या संपांकडे स्थानिक राजकारणी ‘लांडगा आला रे आला...’सारखं दुर्लक्ष करत राहतात. कर्मचारी संप करतात, थोडीफार तडजोड होते आणि काम पुन्हा सुरू होतं; पण पॅरिसमध्ये गेल्या आठवडाभरापासून झालेल्या एका संपामुळे फ्रान्सचं राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षाने या संपाला राजकारण आणि थेट फ्रेंच लोकशाहीशी जोडलं आणि त्यामुळे एरवी विरोधी पक्षाच्या मतांना न जुमानणारे सत्ताधारी पक्षही यावेळी विरोधकांच्या मताशी पहिल्यांदा सहमत झाले आहेत.