Premium|El Nino Monsoon Correlation : एल निनो असूनही महाराष्ट्रात मुसळधार पाऊस का बरसला?

Maharashtra Monsoon Rainfall : एल निनो असूनही यंदा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस का झाला? बदलता एल निनो-मॉन्सून सहसंबंध, प्रादेशिक हवामान आणि हवामान बदलामुळे पावसाचे पारंपरिक अंदाज कसे बदलत आहेत, याचा वेध.
El Nino Monsoon Correlation

El Nino Monsoon Correlation

esakal

Updated on

मयूरेश प्रभुणे - saptrang@esakal.com

यंदाचा पावसाळा सुरू होताना ‘एल निनोमुळे दुष्काळ येणार’ अशा सुरू असलेल्या चर्चा मुसळधार पावसासोबत वाहून गेल्या. ‘यंदा बाजारात जांभळे जास्त आली म्हणजे दुष्काळ येणार’ इथून सुरू झालेल्या समाज माध्यमांमधील पोस्ट ‘कोठे गेला एल निनो’ इथपर्यंत येऊन पोचल्या. एल निनोची स्थिती असूनही धुवांधार कोसळलेल्या सरींमागच्या शास्त्रीय कारणांचा हा वेध...

एल निनो-मॉन्सून सहसंबंध

एल निनो किंवा ला निनाचा भारतातील मॉन्सूनवरील प्रभाव बदलत असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण आयआयटीएमच्या शास्त्रज्ञांनी २०२३मध्ये नोंदवले होते. देशात प्रादेशिक स्तरावर एल निनो- मॉन्सूनच्या दूरस्थ सहसंबंधात (टेलिकनेक्शन) असमानता असून, दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागावर अद्यापही एल निनो किंवा ला निनाचा लक्षणीय प्रभाव असल्याचे हे संशोधन सांगते. एन्सो (एल निनो किंवा ला निना) आणि भारतातील मॉन्सूनचा परस्पर संबंध गेल्या १२० वर्षांत बदलत गेल्याचा निष्कर्ष आयआयटीएममधील शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्यांच्या संशोधनानुसार १९०१ ते १९४० या कालावधीत एन्सो आणि मॉन्सूनचा परस्परसंबंध बळकट होत गेला. १९४१ ते १९८० या कालावधीत तो स्थिर राहिला. तर, १९८१ पासून हा परस्परसंबंध क्षीण होत आहे. डॉ. रॉक्सि कोल यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘एन्सो आणि मॉन्सूनमधील परस्परसंबंध देशभरात सर्वत्र सारखा नाही. गेल्या काही दशकात उत्तर भारतावरील एन्सोचा प्रभाव वाढत गेला आहे. दक्षिण भारतावरील प्रभाव कायम राहिलेला आहे. मात्र, मध्य, पूर्व भारतावरील एन्सोचा प्रभाव कमी झाला किंवा काही ठिकाणी तो राहिलाच नसल्याचे दिसून येते. नोंदींनुसार कोकण, मराठवाडा आणि विदर्भावर एन्सोचा प्रभाव अद्यापही कायम असून, मध्य महाराष्ट्रावरील त्याचा प्रभाव कमी झाला आहे.’’ यंदाच्या एल निनो दरम्यान शास्त्रज्ञांच्या या संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मध्य महाराष्ट्राने घेतला असे म्हणता येईल. हवामान बदलांच्या काळात दूरस्थ घटकांचा मॉन्सूनशी असणारा सहसंबंध बदलणे ही स्वाभाविक प्रक्रिया मानली जात आहे. मात्र, अशा बदलांचा थेट परिणाम हवामान अंदाज चुकण्यामधून आपल्याला दिसून येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com