esakal | गोंदण कलेतील नवे तंत्रज्ञान; इलेक्‍ट्रिक टॅटू
sakal

बोलून बातमी शोधा

Electric tattoos}

गोंदण कलेतील नवे तंत्रज्ञान; इलेक्‍ट्रिक टॅटू

sakal_logo
By
अमोल सावंत

टॅटू हा शब्द मूळ टॅटॅव या शब्दावरून आला. याचा अर्थ "टू मार्क' म्हणजे "खूण किंवा निशाणी उमटवणे' असा होतो. त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी गोंदण काढण्याची प्रथा फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. इजिप्तच्या थडग्यांमधील जतन केलेल्या काही मृतदेहांच्या त्वचेवरही गोंदण केलेले आढळून येते. गोंदण करण्याकरिता वापरण्यात येणारी शाई ही हिरव्या, निळा, काळा, लाल, पिवळा यापैकी कोणत्याही रंगाची असते. ही शाई एका सुईच्या किंवा यंत्राच्या मदतीने त्वचेच्या खालच्या थरामध्ये सोडली जाते. विविध प्रकारची चित्रे, नावं, देवीदेवतांच्या प्रतिकृती आदी गोंदवून घेतल्या जातात.

सौंदर्य खुलवणाऱ्या गोंदणात आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पाश्‍चात्य देशात इलेक्‍ट्रिक टॅटूचा उदय झाला अन्‌ गोंदण तंत्रज्ञानला अधिक गती आली. इलेक्‍ट्रिक टॅटूच्या साह्याने अनेक लोक शरिराच्या अनेक भागावर गोंदण करुन घेत आहेत. त्वचेची दाह न होणारे, न दुखणारे, कोणताही साईड इफेक्‍ट न होणारे हे तंत्रज्ञान आहे. सोशल मीडियावर असे टॅटू कसे तयार केले जातात, याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. आता असे तंत्रज्ञान वापरणारे अनेक कलाकार पुढे आले आहेत. टॅटूची कला ही भारतात प्राचीन काळापासून आहे. तरीही असे नवीन तंत्रज्ञान वापरुन भारतातील टॅटू कलाकार ही पुढे असणार आहेत, हे नक्की. नव तंत्रज्ञान नेमकं काय आहे? चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली चांदर गोंदणी, हे "सर्जाराजा' चित्रपटातील गाणं तुम्ही ऐकलं असेल. होय ना? चला, तर मग जाणून घेऊ या...!

बरेचदा लहान असताना केलेलं गोंदण मोठं झाल्यावर नकोसे वाटते. काहीवेळा मग घरातील किंवा मित्र-मैत्रिणी गोंदण काढून टाकण्याचा सल्ला देतात. जिथे गोंदण लावलेले असते तिथे त्वचेवर चुना किंवा निरमा लावण्यासारखे प्रयोग केले जातात. यामुळे कधी कधी गोंदण निघून जाते; पण तेथे त्वचेवर व्रण तयार होतो. हा व्रण कधीही नष्ट होत नाही. अशावेळेस विनाकारण ताप होतो, हे खरे. तुम्हाला गोंदण काढून टाकावयचे असेल तर थेट डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. गोंदण काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हा पयार्य आतापर्यंत उपलब्ध होता. यामध्ये गोंदण लगेच निघून जाते; पण त्याजागी छोटा व्रण राहतो. गोंदण मोठ्या आकाराचे किंवा नक्षीदार असल्यास त्यावर शस्त्रक्रिया करणे अशक्‍य होते. शस्त्रक्रियेला पयार्य म्हणून आज लेझर उपचार उपलब्ध आहेत. लेझर म्हणजे शक्तिशाली किरणे. ही किरणे त्वचेच्या आतमध्ये जाऊन गोंदणाच्या शाईचे अतिशय छोटे तुकडे करतात. मग हे तुकडे शरीरात शोषले जाऊन ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. या प्रक्रियेला सुमारे दोन महिने लागतात. दोन महिन्यानंतर परत उपचार करता येतात. सुमारे तीन ते सहा वेळेला उपचार केल्यास गोंदण संपूर्णपणे नष्ट होते. लेझर उपचार करातना भुल देण्याची गरज नसते. उपचारांच्या जागेवर काही जखम होत नाही. कोणत्याही आकाराचे किंवा रंगाचे गोंदण लेझरने काढून टाकता येते. लेझरचे त्वचेवर काही दुष्परिणाम होत नाहीत. लेझरमुळे गोंदण निघून गेल्यानंतरची त्वचा आजूबाजूच्या त्वचेसारखीच दिसते. त्याजागी कोणताही व्रण पडत नाही, हा लेझर उपचारांचा मोठा फायदा आहे.

जेव्हा टॅटू कलाकार कायला नेवेल टॅटू शाई खरेदी करण्यासाठी बाजारात जाते. तेव्हा ती आपल्याबरोबर एक अतिनील प्रकाश किरणांचे उपकरण घेऊन येते. ओरेगॉन राज्यातील (अमेरिका) पोर्टलॅंडमधील टॅटू कलाकार अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये चमकताना दिसणारे रंग वापरून चमकदार डिझाईन्स तयार करतात. नेवेल म्हणते, ""बहुतेक लोकांना हे समजत नाही की, अनेक ऑफ-द-शेल्फ टॅटू शाईंचा हा प्रभाव आहे.'' टॅटू शॉपच्या शेल्फवर शाईच्या कुशीवर तिचा अल्ट्रा व्हायोलेट लाइट लावून ती नवीन फ्लोरोसेंट रंगछटांचा शोध घेते. नेवेल ही फॉस्फरस वापरणारे रंगद्रव्य देखील टाळते. फॉस्फरसमुळे जरी शाई चमकू शकत असली तरी; त्याचा आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी चिंता आहे. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल की, तुम्ही कल्पना करु शकणार नाही, अशा रचना टॅटूच्या साह्याने शरिरावर करता येणे शक्‍य आहे. अलिकडच्या काही वर्षांत शरिरावर सुक्ष्म दिवे, विविध सर्किटसह प्रायोगिक इलेक्‍ट्रॉनिक टॅटूबद्दल नवा ट्रेंड जगभरात विकसित झाला आहे. अशा नवीन तंत्रज्ञानाचा कलात्मक उपयोग होतो, हे अनेकांच्या लक्षात येऊ लागले आहे. नेवेल म्हणते, ""आपण अशा गोष्टी बनवू शकता. ज्या एका क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत पूर्णपणे बदलू शकतील.'' अशी काही इलेक्‍ट्रॉनिक टॅटू आहेत, ज्याद्वारे शरिरावर सर्किट बसवून, त्यावर सुक्ष्म दिवे लावून नवी रंगसंगती अन्‌ नवीन रचना तयार करता येतात.

टॅटू कलाकार आधीपासूनच अल्ट्राव्हायोलेट लाइट अंतर्गत चमकणारी शाई वापरत होते. काही डिजिटल कलाकारांचा संपूर्ण सोशल मीडिया ट्रेंड आहे, जो शरीराच्या आर्टमध्ये काही प्रमाणात हलणारे रंग उत्सर्जित करतात असे भासविण्यासाठी नवीन टॅटूच्या व्हिडिओंवर आभासी प्रकाश प्रभाव सुपरमोज करतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर मिनी निऑन चिन्हासारखे काहीतरी असते. दुर्दैवाने सायबरनेटिक टॅटू कलाकारांसाठी या तंत्रज्ञानाने अद्याप या दृश्‍याकडे लक्ष वेधले गेलेले नाही. काम प्रगतीपथावर असले तरी. टॅटूची फॅशन परदेशाप्रमाणे भारतातही खूप वाढत आहे. मेंदीचं सुंदर रेखाचित्र रंगवून हातपाय सुशोभित करणे, त्यानुसार शरीराचे सौंदर्य वाढवणे किंवा हातपाय रंगवणं, हा सौंदर्यप्रसाधनाचा एक भाग आहे; पण मेंदी किंवा अळिता यांचा रंग हा त्वचेच्या बाह्य थरापुरता म्हणजे बाह्यत्वचेपुरता मर्यादित असतो. बाह्यत्वचेवरच्या मृत पेशी जशा निघून जातात तसा हा रंग फिका होत शेवटी नाहीसा होतो. काही जणांना आपल्या त्वचेवर कायमचे रेखाचित्र हवे असते. शिवाय मेंदी-अळित्याचा रंग फक्त लालच असू शकतो. कायमचे रेखाचित्र ज्यांना हवे असते त्यांना त्यात विविध रंग असलेले आवडतात. अशा व्यक्ती मग अंगावर गोंदवून घेतात. या गोंदणाला पाश्‍चिमात्य नाव टॅटू असे आहे. आपल्याकडे ही ते आता लोकप्रिय झाले आहे. पाश्‍चिमात्य देशांत शरीराच्या विविध भागांवर गोंदवून घेण्याची फॅशन आहे. तसे करून देणारे कलाकार आणि त्यांची पार्लर्स असतात. आपल्याकडेही हे लोण गतीने येत आहे.

संशोधकांनी चांदीच्या नॅनो वायर असलेली एक विशेष शाई आणली आहे. ही शाई शरीरावर छापली गेली. यानंतर लवचिक आणि विद्युतीयदृष्ट्या प्रवाहीत केली. मुद्रित साहित्यातून वीज वापरली गेली, तेव्हा तिथे एक लहान एलईडी लाइट जोडला गेला. ड्यूक युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात एक लवचिक वायर वापरली असून त्याद्वारे त्वचेवर छापली जाऊ शकते. विल्यम्स म्हणाले, ""असे तंत्रज्ञान वैद्यकीय कारणांसाठी उपयुक्त ठरू शकते. तेथे कलात्मक प्रयोगही होऊ शकतात.'' प्रोटोटाइपमध्ये वापरलेल्या मुद्रित नॅनो वायर मटेरियलच्या धातूच्या स्वरूपावर नेवेल म्हणते, ''मी बऱ्याच लोकांशी बोलले. त्यांना असे वाटते की त्यांच्याकडे धातूचा, सोन्याचा रंगाचा टॅटू असू शकेल.''

गोंदण्याची प्रथा खूप जुनी आहे. जपानमध्ये दहा हजार वर्षांपूर्वीपासून गोंदवून घेत असत. इजिप्तमध्येही फार पूर्वीपासून ही प्रथा होती. उत्खननात सापडलेल्या इ.स. पूर्व दोन हजार वर्षे जुन्या ममींवर गोंदल्याच्या खुणा सापडल्या आहेत. भारतातही गोंदण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. विशेषकरून वयात आलेल्या मुलींच्या कपाळावर, हातांवर, बोटांवर गोंदलं जात असे. दृष्ट लागू नये म्हणून, रोगांपासून संरक्षण आणि सौंदर्य वाढवणं अशा विविध कारणांसाठी गोंदलं जात असे. विविध संस्कृतींमध्ये आणि विविध देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी गोंदण किंवा टॅटूचा उपयोग केला जात असे. काही देशांमध्ये विशिष्ट कौशल्य अवगत असलेल्या महिलेच्या कोपर ते मनगट या भागावर विशिष्ट रेखाचित्र गोंदवीत. ग्रीक लोक गोंदण्याचा उपयोग हेरगिरीमध्ये करीत तर रोमन लोक गुन्हेगार आणि गुलाम ओळखण्यासाठी त्याचा वापर करीत. एखाद्या माणसाचं सामाजिक स्थान अधोरेखित करण्यासाठी पश्‍चिम आशियातील लोक या कलेचा उपयोग करीत. काही देशांमध्ये गोंदण्याला धार्मिक महत्त्व दिले जात होते तर काही ठिकाणी विशिष्ट सण, उत्सवासाठी ते आवश्‍यक समजले जात असे. कॅप्टन जेम्स कुकने आपल्या बोटीवरच्या सफरीत भेट दिलेल्या देशांमध्ये ही पद्धत पाहिली आणि पाश्‍चिमात्य जगाला या प्रथेची माहिती झाली.

पूर्वीच्या काळी गोंदण्यासाठी त्वचेला चरे पाडीत. मग त्या चऱ्यांमध्ये राख, कोळशाची पूड किंवा रंग भरला जाई. आपल्याकडे पूर्वीपासून सुया वापरत असत. हाताने सुई धरून तिच्या साह्याने शरीरावर छिद्र पाडून सुईनेच त्यामध्ये रंग भरीत. बऱ्याच वेळा हा रंग म्हणजे वनस्पतींपासून बनवलेला हिरवा रंग असे आणि त्यामुळे बहुतेक स्त्री-पुरुषांच्या अंगावरील गोंदण हिरवे दिसत असे. अजूनही खेड्यापाड्यांतील जत्रांमध्ये, आदिवासी भागांमध्ये अशा पद्धतीने गोंदवणारे लोक असतात. आधुनिक काळात आता मात्र वेगळी यंत्रे वापरली जातात. भांड्यांवर नाव कोरणारं यंत्र एडिसनने शोधून काढले आणि त्या धर्तीवर पहिलं टॅटू मशिन सॅम्युअल ओरायलीने 1891 मध्ये तयार केले. आता जी यंत्रं वापरली जातात ती विद्युतयंत्रांवर चालतात. यामध्ये निर्जंतुक केलेली सुई असते. मशिनमधून त्वचेत रंग भरला जाण्यासाठी एक ट्यूब असते. एक मोटर असते आणि शिवणाऱ्या यंत्राला गती देण्यासाठी पेडल असते. तसेच पेडल, सुईची गती कमी-जास्त करण्यासाठी या यंत्रातही असते. विद्युत्‌चुंबकीय परिणामामुळे सुई कंपन पावते आणि त्वचेमध्ये मिनिटाला पन्नास ते तीन हजारपर्यंत छिद्रं पाडू शकते. त्वचेमध्ये ही सुई एक मिलिमीटरपर्यंत आत जाते आणि त्याच वेळी पाण्यात आणि विरघळणाऱ्या रंगाचा (ज्याला टॅटू इंक असं म्हणतात) ठिपका त्या छिद्रापासून आत सोडते. हा रंग आंतः त्वचेमध्ये सोडला जात असल्याने मृत पेशी त्वचेवरून निघून जातात. बाह्यत्वचा थर अतिशय पातळ असल्याने त्यामधून त्याखालचा आंतःत्वचेमधला हा रंग स्पष्ट दिसतो.

आंतःत्वचेतील पेशी त्यांच्या जागी व्यवस्थित राहत असल्याने हा रंग त्या ठिकाणी टिकून राहतो; हलत नाही आणि गोंदलेलं रेखाचित्र कायमसवरूपी राहते. अत्याधुनिक यंत्रामध्ये पाच सुया असतात. जाडी वेगवेगळी असते. जसे शेडिंग हवे असेल त्याप्रमाणे योग्य सुया वापरल्या जातात. गोंदण्यासाठी वापरलेल्या रंगाला "टॅटू इंक असं म्हणतात. असे रंग विकत मिळतात किंवा पावडर विकत आणून विशिष्ट द्रवात मिसळून रंग तयार करता येतात. या पावडर म्हणजे वनस्पतिजन्य रंग असतात किंवा धातूंची संयुगं अथवा प्लॅस्टिकपासून केलेले रंगही असू शकतात. पूर्वीच्या काळी वनस्पतिजन्य रंग तसेच खनिजांची, कोळशाची पूड यांचा वापर केला जात असे. आता काळ्या रंगासाठी कोळशाची पूड किंवा लोखंडाचं मॅग्नेटाईट नावाचं काळं संयुग, पिवळ्या रंगासाठी लोखंडाचं वेगळं संयुग, माती यांचे मिश्रण तसेच कॅडमियमचं संयुग वापरलं जाते. हळदीमधील कुरक्‍युमिनचा वापरही पिवळ्या रंगासाठी करतात.

हिरवा रंग हा क्रोमियमची संयुगे आणि फेरोसायनाईड्‌सपासून मिळवला जातो. तांब्याची संयुगंही हिरव्या रंगासाठी वापरली जातात. निळ्या रंगासाठी कोबाल्टची संयुगे, तांब्याची संयुगे, सोडियम ऍल्युमिनियम सिलिकेट यांचा वापर केला जातो. जांभळा आणि मॅजेंटासाठी मॅंगेनीज तसेच ऍल्युमिनियमची संयुगे उपयोगी पडतात. या सर्व रंगांच्या फिक्‍या रंगछटा तयार करण्यासाठी पांढऱ्या रंगाची गरज असते. हा पांढरा रंग टिटॅनियम ऑक्‍साईडसारख्या रसायनांपासून मिळवला जातो. रंगाची पूड विरघळवून पातळ शाई तयार करण्यासाठी जे द्रवपदार्थ लागतात त्यामध्ये एथिल अल्कोहोल, विच हेझल, ऑपेलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन, शुद्ध पाण्यांचा अंतर्भाव होतो.

कायमस्वरूपी विविधरंगी टॅटू वापरले जातात; पण काहींना विविधरंगी रेखाचित्रं शरीरावर तात्पुरती हवी असतात; कायमस्वरूपी नको असतात, अशांसाठी तात्पुरते टॅटू उपलब्ध असतात. ही रंगीत चित्रं असतात आणि त्याखाली एक स्टिकर असतो. तो सोलून काढून टाकून चित्र हव्या त्या भागावर चिकटवता येते. एखाद्या आठवड्यात हे रंग निघून जातात. याशिवाय वॉटर कलर्स किंवा ऑईल कलर्स वापरून ब्रशच्या साह्यानं काही जण चेहरा, पाठ, पोट, हात, पाय वगैरे अवयव रंगवून घेतात. हाही रंग लवकर पुसून टाकता येतो. कायमस्वरूपी टॅटू काढून टाकण्यासाठी सध्या लेझरचा वापर केला जातो, पण ती एक मोठी किचकट अशी प्रक्रिया असते.