
संदीप कामत
saptrang@esakal.com
एलॉन मस्क यांची ओळख महान उद्योगपती, संशोधक अशी मागच्या वर्षीपर्यंत होती. पण हल्ली एलॉन मस्क म्हटलं की अमेरिकी राजकारण समोर येतं. या आठवड्यात मस्क यांनी दोन प्रमुख राजकीय पक्षांना पर्याय देणारा तिसरा पक्ष ‘अमेरिका पार्टी’ काढला आणि ‘राजकारणी’ एलॉन मस्क या प्रतिमेवर शिक्कामोर्तब झालं. ट्रम्प आणि मस्क यांच्या संबंध दुरावण्याची कारणं काय, मस्क यांच्या नवीन पक्षाचं भवितव्य काय असेल, मंगळ ग्रहावर उतरण्याची आस ठेवणारे मस्क व्हाइट हाउसमध्ये पोचतील काय या अनुषंगानं घेतलेला आढावा...
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांचं नातं नेहमी थोडंसं फिल्मी राहिलं आहे. त्यामुळे हे दोघं एकत्र आल्यावर त्यांना फॉलो करणाऱ्या जाणकारांना ‘ही युती टिकेल का’ हा प्रश्न कधी नव्हताच. फक्त ‘ही युती किती काळ चालेल’ एवढाच अंदाज बांधायचा होता. दोन्हीही व्यक्तिमत्त्वे अतिशय प्रबळ आणि हुकूमशाही स्वभावाची आहेत. दोघांनाही समोरून आलेला नकार आवडत नाही. एकीकडे नेहमीच ‘नाट्यपूर्ण’ असणारे ट्रम्प अध्यक्ष होण्यापूर्वीपासूनच अत्यंत प्रकाशझोतप्रेमी असे टीव्ही रिॲलिटी स्टार होते. आणि पुढे जाऊन एकदा नव्हे, तर दुसऱ्यांदा देशाचे अध्यक्ष झाले.