
एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातला वाद हा दोन शक्तीकेंद्रातला वाद इतकंच त्याचं स्वरूप नाही. तंत्रज्ञानाधारित उद्योगाचे सर्वेसर्वा लोकशाहीतल्या अनेक संस्था आणि विविध निर्णय यावर कसा प्रभाव टाकू शकतात याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्यामुळेच मस्क यांच्या अरेरावीकडे दुर्लक्ष करता येत नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि टेस्लाचे प्रमुख व उद्योजक एलॉन मस्क यांच्यातील ताजे भांडण जगाचं लक्ष वेधून घेणारं होतं. दोघेही स्वप्रेमात बुडालेले आणि श्रीमंतीचा तोरा मिरवण्यात धन्यता मानणारे. त्याचं एकत्र येणं हे काही मूल्यांवर, विचारसरणीवर किंवा किमान काही कार्यक्रमांवर देखील आधारलेलं नव्हतं. त्यात उघडावाघडा स्वार्थ होता. जोवर एका मार्गानं जाण्यात उभयतांचे हित होते, तोवर ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ गाताना दोघेही थकत नव्हते, मात्र ट्रम्प केवळ उद्योजक नाहीत तर राजकीय नेतेही आहेत.