
मनात एक अन् चेहऱ्यावर दुसरेच हावभाव दाखवत अनेकजण काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. काही कारणास्तव तणावात असले, तरी चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणून दुःख लपवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा लोकांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे फार कमी लोकांना ओळखता येते; परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या डोक्यात सुरू असलेली चलबिचल, त्याची मानसिकता तसेच तो व्यक्ती आनंदी आहे की दुःखी हेदेखील सहज समजणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर वाढल्यापासून प्रत्येक क्षेत्रात नवनवे संशोधन सुरू आहे. नवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या सर्वांचेच आयुष्य सुकर करण्यापासून विविध क्षेत्रांत कामाची उपयुक्तता वाढविण्यासाठी ‘एआय’ची मदत घेतली जात आहे. शिक्षण, आरोग्य, कला, मनोरंजन, विज्ञान, कॉर्पोरेट अशा नानाविध क्षेत्रापासून ते अगदी दररोजच्या आयुष्यातही ‘एआय’चा सहजरीत्या वापर केला सुरू आहे. एवढेच नव्हे, तर आतापर्यंत आपण कल्पनाही न केलेल्या गोष्टींसाठीही ‘एआय’चा वापर करून अत्याधुनिक संशोधने सादर होत आहेत. अशाच प्रकारे लोकांच्या मनात नेमके काय सुरू आहे, त्यांचा स्वभाव नेमका कसा आहे, त्यांची मानसिक स्थिती कशी आहे, हे आता डोळे आणि चेहऱ्यावरील हावभावावरून ‘एआय’च्या मदतीने विकसित केलेल्या अत्याधुनिक प्रणालीमुळे समजणार आहे.