
Indian Monsoon
esakal
हवामानाचा विचार करताना त्याचा संपूर्ण पट लक्षात घ्यावा लागतो. कधी-कधी एखादा छोटासा वाटणारा घटकसुद्धा प्रभाव पाडून जाऊ शकतो, तर खूप प्रभावी समजला जाणारा घटकही निष्प्रभ बनू शकतो. म्हणूनच निसर्गातील विविध घटकांचे योग्य आकलन होणे आणि त्यांच्याबद्दलची जाण अधिकाधिक वाढवत जाणे गरजेचे आहे. या वर्षीच्या पावसाने आणि ‘एल-निनो सदर्न ऑस्सिलेशन’ या घटकाने दिलेला हा धडाच आहे, असे समजायला हरकत नाही.
भारतात मॉन्सूनच्या काळातील पाऊस, विशेषत: अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थिती यांचा सर्वाधिक संबंध असतो तो, हवामानाच्या दोन प्रमुख घटकांशी. हे घटक म्हणजे, एल-निनो आणि ला-निना! त्यांना मिळून ‘एल-निनो सदर्न ऑस्सिलेशन’ अर्थात ‘इन्सो’ (ENSO) असेही म्हटले जाते. मॉन्सून काळातील पावसाचा अंदाज देताना आणि पुढे संपूर्ण पावसाळी हंगाम कसा जाणार? हे समजून घेण्यासाठी सुद्धा याच घटकांची सर्वाधिक दखल घ्यावी लागते. तसे भारतातील पावसाला प्रभावित करणारे अनेक घटक आहेत. ते केवळ स्थानिक घटक नव्हेत, तर जागतिक घटक आहेत. त्यात अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, युरेशिया अशा विविध भागातील घटकांचा समावेश होतो.