

How Epigenetics Controls Gene Activity
esakal
डॉ. दिलीप निकम - sakal.avtaran@gmail.com
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीकडे जवळजवळ एकच डीएनए असतो; तरीही मेंदू, हृदय, यकृत आणि त्वचेच्या पेशींची कामे वेगवेगळी का असतात? याचे उत्तर केवळ जनुकांमध्ये नाही, तर एपिजेनेटिक्समध्ये दडलेले आहे. त्यामुळेच ‘आपण असेच का आहोत?’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना एपिजेनेटिक्स विज्ञानाला एक नवा दृष्टिकोन देते.
वारसा हक्काने फक्त जमीन, जुमला किंवा बाळसेदार बँक खातीच मिळतात असे नाही; तर काही गोष्टी अशा असतात ज्या सरकारी कागदपत्रांवर कुठेच दिसत नाहीत; पण त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी मोफत संक्रमित केल्या जातात. उदाहरणार्थ आपल्या शरीराची उंची, त्वचा-डोळ्यांचा रंग, काही आजारांची शक्यता, शरीराची बांधणी या सर्व बाबी ठरविण्यामध्ये मुख्य भूमिका बजावणारी जनुके आई-वडिलांकडून पुढच्या पिढीला दिली जातात. त्यामुळे बराच काळ विज्ञानात अशी समजूत होती, की आपल्या डीएनएमध्ये जे लिहिले आहे, तेच आपल्या आयुष्याचे भविष्य ठरवते. हे खरे असेल तर आपल्या शरीरातील मेंदू, हृदय, त्वचा आणि यकृत यांच्या पेशींमध्ये जवळजवळ समान डीएनए असतो; तर मग त्या सगळ्या पेशी वेगवेगळे काम कसे करतात, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. मेंदूची पेशी विचार करते, हृदयाची पेशी धडधडते, यकृताची पेशी शरीरातील रसायनांचा हिशेब सांभाळते आणि त्वचेची पेशी बाहेरून संरक्षण करते. म्हणजेच सगळ्यांकडे डीएनएरूपी एकच ‘पुस्तक’ असले तरी त्या पुस्तकातील धडे मात्र वेगवेगळे असून, प्रत्येक पेशी त्यातील वेगळे पान वाचण्यासारखे आहे.