
भारतीय व्यक्ती आहारात प्रमाणापेक्षा दुप्पट मीठ खाते. साहजिकच उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मूत्रपिंडाचे आजार बळावतात, असे निरीक्षण नुकतेच नोंदवण्यात आले. मिठाचे अतिसेवन आरोग्यासाठी ‘टाइम बॉम्ब’ ठरत आहे. मीठ कमी करणे म्हणजे स्वाद-चवीचा त्याग करणे असा होत नाही. आपल्या सवयीपेक्षा आरोग्याला जास्त प्राधान्य देणे गरजेचे आहे.
मीठाला ‘सफेद विष’ म्हणतात. कारण, मीठ अतिरिक्त प्रमाणात खाल्ले गेल्यास अशा अनेक आरोग्य समस्या उद्भवतात, ज्यांनी भारतात आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. मानवी शरीरामध्ये द्रव संतुलन, मज्जातंतूचे कार्य आणि स्नायूंचे आकुंचन राखण्यासाठी मीठ आवश्यक आहे. मात्र, आधुनिक भारतीय आहारात मिठाचा वापर सुरक्षित मर्यादेच्या पलीकडे पोहोचला आहे. मिठाचे अत्याधिक सेवन उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मूत्रपिंड विकार आणि स्ट्रोकसाठी अत्यंत जोखमीचे आहे. साहजिकच त्यामुळे देशभरात सार्वजनिक आरोग्य एखादी मोठी साथ आल्याप्रमाणे धोक्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, एका वयस्क व्यक्तीचे दर दिवशीचे मिठाचे सेवन पाच ग्रॅमपेक्षा कमी असावे. म्हणजे जवळपास एक चमचा मीठ प्रमाणात आहे. पण, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनातून आढळून आले आहे, की एक सरासरी भारतीय व्यक्ती दररोज जवळपास १० ते ११ ग्रॅम मिठाचे सेवन करते. अर्थात सुचवण्यात आलेल्या मर्यादेच्या दुप्पट. आहाराविषयीच्या मार्गदर्शक सूचनांकडे केले जाणारे दुर्लक्ष दर्शवणारी ही चिंताजनक आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे आपली पाकसंस्कृती मिठावर किती जास्त अवलंबून आहे हेदेखील त्यातून अधोरेखित होते.