
तू शूटिंग व्यवस्थित कर. मी जे बोलतो आहे ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड कर, बस मग आपलं काम झालंच. आपला खूप साधा प्रश्न असणार आहे, ‘मनोरंजनाला आयुष्यात किती महत्त्व असलं पाहिजे?’ कॅमेरामनला मी घाईघाईत सांगितलं. त्याने फक्त मान हलवली... नाही, तो आज्ञाधारक आहे, असं नाही. मला उत्तर देण्यापेक्षा त्याला त्याच्या तोंडातील मावा जास्त महत्त्वाचा वाटला. अहो, साधं यूट्युब चॅनल आहे आमचं. त्यामुळे आम्ही असेच असणार आहोत. मी खात नाही मावा, रिपोर्टरचे दात दिसतात ना! हाहाहाहा... तुम्हाला वाटलं असेल, कॅमेरामन आणि मावा हे काय प्रकरण आहे त्यामुळे हे सांगितलं. आमचं खूप साधं यूट्युब चॅनल आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखवू या उद्देशानेच सुरू केलेलं होतं.
आपल्या चॅनलवर खऱ्या बातम्या दाखवू, समाजातील खरे प्रश्न मांडू, हाच विचार केला होता सुरुवातीला. तीन वर्षं झाली चॅनलला, तरी दोन हजारांच्या वर सबस्क्रायबर काही वाढेनात. दीडशे ते दोनशे एवढ्याच व्ह्यूज मिळतात बातमीला. जिद्द आणि संयम असावा माणसाकडे; पण किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? आता हा जो माझ्यासमोर कॅमेरामन आहे तो तीन वर्षांतील पाचवा कॅमेरामन आहे. चॅनलची ग्रोथ नाही म्हणून सोडून जातात. पण, कोणी असं म्हणत नाही, की चल आपण दोघे मिळून ग्रोथ करूया चॅनलची. कदाचित सगळ्यांना आयत्या यशावर बसायचं असेल किंवा यशाचा वेग मंदावलेला आवडत नसेल. शेवटी काय तो सोक्षमोक्ष लावायचा, असं ठरवून आज प्रेक्षकांनाच विचारावं म्हणलं, ‘मनोरंजन आयुष्यात किती महत्त्वाचं असलं पाहिजे आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत?’