
झपाट्याने बदलणाऱ्या नात्यांमुळे लोकांना भावनिक आधार मिळत नाही. त्यामुळे ते अंतर्मुख, एकटे आणि तणावग्रस्त होतात. सतत बदलणारे हवामान, नोकरीतील अनिश्चितता, आरोग्याच्या समस्या यामुळे मनावर ताण येतो आणि भावनिक अस्थिरता वाढते. त्यामुळे भावना योग्य रीतीने व्यक्त होणे गरजेचे आहे.
मानव एक सामाजिक प्राणी आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया हा त्याच्या भावनांमध्ये दडलेला असतो. भावना म्हणजे काय, तर मनाच्या अतिशय सूक्ष्म आणि जिवंत हालचाली. आपण कधी आनंदित होतो, कधी दुःखी, कधी रागावतो-चिडतो, कधी गहिवरतो, भांडतो. हे सगळं म्हणजेच भावना. मानवी भावना ही प्रत्येकाच्या जीवनाची एक अविभाज्य बाजू आहे. ती केवळ आपल्या मानसिक अवस्थेचं प्रतिबिंब नसते; तर आपल्याला सामाजिक, शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून आकार देणारा घटक असते. बालपणापासूनच आपण भावना अनुभवायला लागतो. आईच्या मिठीतला सुरक्षितपणा, वडिलांचा राग, शिक्षकांचं कौतुक, मित्रांची साथ हे सगळं भावनांचंच तर रूप आहे.