
मैत्रेयी पंडित-दांडेकर
नवीन वर्ष सुरू झालं हे कसं ओळखायचं? तर, अचानक मम्मा सूर्योदयापूर्वी उठून व्यायामाला जाऊ लागते. जीजीनी पाठवलेल्या गूळपोळ्या लपूनछपून न खाता बाबा सर्वांना दाखवत चक्क सफरचंद खातो. आणि दोघंजण आमच्याबद्दलचं तेच ते गॉसिपचं दळण दळण्याऐवजी या नव्या वर्षासाठी नव्या संकल्पांचे गगनचुंबी मनोरे रचू लागतात. पण, मी आणि नीवू मात्र संकल्प-बिंकल्प यावर विश्वास नसलेल्या गटात मोडतो. त्याचं खरं कारण असं, की आमच्या मेंदूचा आकार अजून थोडासा लहान असल्याने त्यात आम्ही फक्त आमच्या फायद्याच्या मोजक्या गोष्टी साठवून जागेची बचत करतो. त्यामुळे आम्हाला भूतकाळ फारसा आठवत नाही आणि भविष्याबद्दल बोलायचं झालं तर श्री. श्री. शाहरुख खान काकांनी सांगितलंच आहे 'कल हो ना हो'. त्यानुसार आम्ही आपलं ‘वन डे ॲट ए टाईम' म्हणजे फक्त वर्तमानातच जगतो!