
प्रवीण देसाई
राज्यातील महत्त्वाच्या शक्तिपीठांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. गरज नसताना हा मार्ग करण्यात येत असून, यामध्ये सुपीक जमीन घेण्यात येत आहे, असे म्हणत विरोधकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. १२ जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा नुकताच मुंबईच्या आझाद मैदानावर काढण्यात आला. सरकारला हा महामार्ग करायचा आहे, मात्र तो कोणावर लादायचा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.
लोकसभा निवडणुकीत या महामार्गाच्या विरोधाचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतली होती. आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा या प्रकल्पावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे, या आंदोलनाची तीव्रता वाढणार असून, त्याभोवतीचे राजकारणही तापत जाणार हे निश्चित आहे.