

Farmers' Struggle
esakal
बच्चू कडू - Bacchuprahar41@gmail.com
उद्याचा दिवस कोणता असेल, हे कुणालाच माहीत नाही; पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, की जोपर्यंत या मातीतला शेतकरी अन्यायाविरुद्ध लढत आहे, एखादा दिव्यांग हक्कासाठी दार ठोठावत आहे, मेळघाटातील एखादं मूल शिक्षणाची वाट पाहत आहे, तोपर्यंत आमच्या संघर्षालाही पूर्णविराम असणार नाही. म्हणून या लेखमालेचा हा शेवट नाही; तर फक्त एका संवादाचा विराम आहे...
गेल्या वर्षभरात ‘सकाळ’च्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला आम्ही तुमच्या भेटीला आलो. हा प्रवास फक्त आमच्या आयुष्याचा नव्हता; तर संघर्षावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो सामान्य माणसांच्या आशा-आकांक्षांचा होता. या लेखमालेत आम्ही आमच्या आयुष्यातील अनेक प्रसंग तुमच्यासमोर मांडले. आई-वडिलांचे संस्कार, गरिबीतून उभं राहिलेलं आयुष्य, शेतकऱ्यांचे लढे, दिव्यांगांच्या न्यायासाठी केलेले संघर्ष, मेळघाटातील पदयात्रा, आदिवासींचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उभारलेली आंदोलनं, राजकारणातील चढ-उतार, विजय-पराभव आणि आयुष्याने शिकवलेले धडे हे सगळं आम्ही कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं. कारण आत्मकथा ही स्वतःचं गौरवगान नसतं; ती स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची संधी असते.
आज या लेखमालेचा शेवटचा भाग लिहिताना मागे वळून पाहतो, तेव्हा समाधानापेक्षा जबाबदारी जास्त जाणवते. कारण अजूनही हजारो शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, हजारो दिव्यांग हक्कासाठी शासनाच्या दारात उभे आहेत, मेळघाट अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडतो आहे आणि सामान्य माणसाचा संघर्ष संपलेला नाही. त्यामुळे हा शेवट निरोपाचा नाही; तर वर्षभर तुमच्याशी झालेल्या संवादाचा एक प्रामाणिक हिशेब आहे.
आरोप, आंदोलन आणि आमची भूमिका
माझ्याबद्दल एक आरोप कायम केला जातो - ‘बच्चू कडू म्हणजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणारा नेता.’ अनेकांनी त्या काही घटनांच्या आधारावर आमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व ठरवून टाकलं. गुन्हे दाखल झाले, कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागल्या, तुरुंगही पाहावा लागला. आज इतक्या वर्षांनंतर त्या घटनांकडे पाहताना आम्ही कोणताही दिखावा करत नाही. चुकीचं योग्य आणि योग्य चुकीचं ठरवण्याचा प्रयत्नही करत नाही; पण त्या प्रत्येक घटनेमागची परिस्थिती समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एखादा दिव्यांग महिनोन्-महिने कार्यालयात हेलपाटे मारत होता, एखादा शेतकरी अन्यायाने उद्ध्वस्त होत होता, एखाद्या गरीब कुटुंबाला केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे न्याय मिळत नव्हता. त्या वेळी आमचा संताप व्यक्तीवर नव्हता; तो अन्यायाच्या व्यवस्थेवर होता. आज अनुभवाने एवढं नक्की शिकवलं, की संघर्षाची धार कायम ठेवायची; पण शक्य तितका संवादाचा मार्गही खुला ठेवायचा. तरीही अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना किंमत मोजावी लागली, याची कधी खंत वाटली नाही.