
Marathi agricultural dialect words
esakal
डॉ. केशव देशमुख
शेतीचा लळा, मातीचा टिळा आणि गावाचा सोहळा म्हणून शेतीसंस्कृतीमध्ये दिवाळीचा मान खचितच मोठा आहे. अलीकडे शेतीचे नवे शब्दकोश तयार करण्याची पावले पडताना दिसतात. भाषेच्या स्तरावरचे हे काम स्तुत्य आहेच. शेतीच्या ‘समुद्रा’तला हा शब्दसाठा सतत उपसण्याची गरज आहेच.
ध रित्री ही अन्नदात्रीच. अन्नपाणी देणारी शेती ही गावशिवारामध्ये निरंतर जनलोकात वंदनीयच राहिली. वावरात पिकणारे सारे हंगाम आणि वावरातल्या धनधान्यांनी भरणारी ग्रामविश्वातील घरे म्हणजे धनलक्ष्मी. विशाल अर्थाने समृद्धी प्रदान करणारी धान्यलक्ष्मीही. दिवाळीत परंपरंच्या धारेने आणि सामाजिक धारणेने भरघोस धान्याची पूजा, लाडक्या गाय वासरांची पूजा, जनावरांची स्थाने बनलेल्या गोठ्याची पूजा आणि त्यासोबतच दूधदूभते देणाऱ्या पाळीव प्राण्यांची फुलमाळा घालून सजवत आनंदेभरीन होणारी पूजा दिवाळी सणात बहारच आणणारी असते. यानिमित्त गुरावासरांच्या शेणाने घरोघरी अर्थात गोठागोठी पाच पांडवांची सजूनधजून दिवाळीला पूजा मांडण्याचा गावातला प्रघात मोठा उल्हास प्रकट करणारा असा चैतन्यमयी असतो.