
टोल रोडचा प्रारंभ झाला तेव्हा टोलनाक्यावर बराच काळ तिष्ठत राहावे लागायचे आणि रोखीने कर भरावा लागत असे. अशावेळी भविष्यात स्वयंचलित पद्धतीने टोल कापला जाईल, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. मात्र ‘फास्टॅग’ने भारतातील प्रवासाच्या स्वरूपात क्रांतिकारी बदल घडवून आणला. २०१४ मध्ये सुरू झालेल्या फास्टॅगमागे एक साधी-सरळ संकल्पना होती, ती म्हणजे ‘वन नेशन, वन टॅग’. याचाच अर्थ संपूर्ण देशभर एकाच टॅगवर टोल भरण्याची सुविधा. वास्तविक भारत आता ‘फास्टॅग’च्या पलीकडे जात ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट-आधारित टोल प्रणालीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या माध्यमातून भविष्यात टोलनाके पूर्णपणे हटवले जाऊ शकतात.
टोलनाक्यावर रांग पाहून बहुतांश वाहनचालक वैतागतात. अगोदरच टोलच्या वाढत्या दराने त्रागा व्यक्त करणारे वाहनचालक कधी संपते ही रांग असा विचार करतात. परदेशातील व्यवस्थेप्रमाणे झर्रकन टोलनाक्यावरून कसे जाता येईल किंवा विना टोलनाका प्रवास कसा करता येईल, अशीही मते यानिमित्ताने मांडली जातात. म्हणून फास्टॅग सुविधा असतानाही रांगेत जाणारा वेळ पाहून सरकारला या व्यवस्थेत आणखी बदल करण्याची गरज भासू लागली. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने वार्षिक टोल पासची घोषणा केली. या पासची महत्त्वाची अट म्हणजे तो केवळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)द्वारे संचालित महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरच वैध असेल.