
जगभरात भीती आता एक राजकीय रणनीती बनली आहे. ट्रम्पपासून ऑर्बानपर्यंत, जगभरातली सत्ताकेंद्रे भीती विकत आहेत. कधी सुरक्षा, कधी अस्मिता, कधी देशद्रोहाच्या नावाने. पण या सगळ्याच्या बदल्यात नागरिक काय गमावताहेत, याचा विसर पडत चाललाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर सुरक्षा कारण दाखवून हजारो राष्ट्रीय गार्ड आणि मरीन तैनात केले. यामुळे त्यांच्या स्थलांतर धोरणाविरोधात होणाऱ्या हिंसात्मक प्रतिरोधाला अधिकच तात्त्विक बळ मिळाले. तृतीय विश्वसदृश अराजकता; अतिक्रमित उपनगरे; परदेशी झेंडे हातात घेऊन फिरणारे बंदुकीधारी दंगलखोर; जागोजागी निर्वासित, अल्पसंख्याक, वामपंथी यांसारख्या अमेरिकेच्या छुप्या शत्रूंचे वास्तव्य. अमेरिकेच्या विनाशाचा धोका मिरवणाऱ्या ट्रम्पच्या विधानांमध्ये या गोष्टी सातत्याने झळकतात.
वास्तविकतेऐवजी भ्रम, प्रश्नांऐवजी धमक्या, उपायांऐवजी बोट दाखवणे. गेल्या आठवड्यात त्यांनी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटला (आयसीई) अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या निर्वासन मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊन टाकले. कागदपत्रांशिवाय राहणारे स्थलांतरित देशभरात गुन्हेगारी, संघर्ष आणि अराजकता निर्माण करत आहेत, असं सांगून. पण ‘आयसीई’च्याच आकड्यांनुसार २०२५मध्ये अटक झालेल्या स्थलांतरितांपैकी ७५ टक्के लोकांवर अतिशय किरकोळ आरोप आहेत. होमलँड थ्रेट असेसमेंट या अहवालानुसार अमेरिकन समाजासाठी सगळ्यात घातक धोका दहशतवाद नसून, फेंटानाइलसारख्या सिंथेटिक औषधांची तस्करी आहे.