
भूतदयेबद्दल पोटतिडकीने बोलणारी हजारो मंडळी गेल्या आठवड्यात कबुतरांना खायला देण्यावर बंदी घालणाच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आक्रमक झालेली दिसली. सुदैवाने, मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खायला न देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा अंतरिम आदेश जारी केला. सर्वाच्च न्यायालयानेही या आदेशविरुद्धची याचिका फेटाळून कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. दरम्यान, दिल्लीतील भटक्या कुत्र्यांसंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. हे सर्वच निर्णय काळाची गरज आहेत व मानवी आरोग्यासाठी लाखमोलाचे ठरणारे आहेत.
कबुतरांच्या वाढत्या संख्यावाढीचे कारण मुख्यत्वे कबुतरांना खायला देणाऱ्या मंडळींची भ्रामक भूतदया आहे. मुंबईसारख्या शहरात कबुतरांच्या संख्येत झालेली विस्फोटक वाढ केवळ लोकांसाठीच गंभीर आरोग्यविषयक चिंतेचा विषय व पर्यावरणीय धोकादेखील आहे. फुफ्फुसविकार तज्ज्ञ, पशुवैद्य आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञांनी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे मानवी आरोग्याला आणि पर्यावरणातील अन्नसाखळीला होणाऱ्या दुष्परिणामांबाबत धोक्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु भूतदयेबद्दल बोलणाऱ्या मंडळींनी याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. या लोकांची भ्रामक भूतदया कबुतरांची संख्यावाढ होण्यास व एका निरुपद्रवी पक्ष्याच्या अस्तित्वाला राक्षसी स्वरूप प्रदान करणारी ठरली आहे. कबुतरांना ‘उडणारे उंदीर’ अशी उपमा देऊन त्यांच्याकडे अपायकारक पक्षी म्हणून पाहण्याची वेळ ओढवली आहे. प्राणी-पक्ष्यांविषयी मनात करुणा जरूर असावी; पण त्या करुणेमुळे मनुष्याच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होणार असल्यास भूतदया बाजूला सारून जनहिताचे निर्णय घ्यायला हवेत.