पुणे: नेहा आणि वृषाली दोघी चांगल्या मैत्रिणी आणि त्या काम देखील एकत्र करत असत. दोघी एकमेकींना मदत करायच्या. पण एकमेकींना मदत करता करता नेहावर अनेकदा कामाचा अधिक ताण येत होता. पण तिने तो कधीही बोलून दाखवला नाही. वृषाली देखील तिला गृहीत धरत गेली. हे खूप दिवस सुरु होते.
वृषाली दुखावली जाईल अशी भीती तिला कायमच होती. या सगळ्यात एकीकडे कामाचा ताण तर दुसरीकडे मीच जास्त काम करतीये या विषयावरून दोघींच्यात गैरसमज व्हायला सुरुवात झाली.
अनेक दिवस या गोष्टी सुरु असल्याने या दोघीही वैतागल्या होत्या. त्यांची चांगली मैत्री असूनही त्या दोघींच्याही एकमेकींविषयीच्या मैत्रीच्या, प्रेमाच्या भावना कोरड्या पडत चालल्या होत्या. दोघींनाही मला कोणीही समजून घेत नाही असे वाटू लागले होते. अशातून दोघीही स्वतःला त्रास करून घेत होत्या..
शारीरिक दुखणी खुपणी सांगता येतात. ती लोकांना समजतात, त्याचे निदान करणे देखील सोपे असते पण भावनांच्या गुंत्याचं काय..? सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था असते. अशा वेळी 'इमोशनली ड्रेन' होणं साहजिक असतं.
कामाच्या ठिकाणी, कौटुंबिक स्थितीत, प्रेमाच्या नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये आणि याही व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अशी परिस्थिती येते की जिथे भावनिक परिस्थिती हाताळणे अवघड होऊन बसते. किंवा भावनिक ताण येऊन त्याचा परिणाम कामावर, त्याच्या गुणवत्तेवर, नातेसंबंधांवर, शरीरावर, झोपेवर आणि एकुणातच तुमच्या जीवनशैलीवर होतो.
खूपदा ही अशी परिस्थिती असते की जिथे एका ठराविक पातळीला येऊन व्यक्ती भावनिकरीत्या शब्दशः कोरडी झालेली असते म्हणजेच 'इमोशनली ड्रेन' झालेली असते. ही परिस्थिती तात्पुरती जरी असली तरी त्या ठराविक कालावधीसाठी ती अत्यंत त्रासदायक असते. म्हणूनच सर्वात आधी आपण अशा परिस्थितीत आहोत हे कसं ओळखायचं? इमोशनली ड्रेन होणं म्हणजे काय? अशा वेळी तुम्हाला नेमकं काय होतं असतं? या विषयीचं संशोधन काय सांगतं? ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने कशी हाताळायची? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या लेखाच्या माध्यमातून..